बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांवर ट्रॅकर्स स्थापित केले

अमेरिकेच्या प्रशासनाचे पाऊल : 24 तास ठावठिकाण्यावर देखरेख : 2363 स्थलांतरितांची डिटेंशन सेंटरमध्ये रवानगी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेतून डिपोर्ट होत असलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या वापसीनंतर अनेक नवे खुलासे होत आहेत. अमेरिकेने आतापर्यंत वैध दस्तऐवजांशिवाय वास्तव्य करणाऱ्या 20,407 भारतीयांची ओळख पटविली आहे. हे अवैध स्थलांतरित आता अंतिम बेदखल आदेशाच्या (फायनल रिमूवल ऑर्डर)प्रतीक्षेत आहेत. यातील 2467 भारतीय इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटच्या (आयसीई) डिटेंशन सेंटर्समध्ये कैद होते, यातील 104 जणांना अलिकडेच भारतात डिपोर्ट करण्यात आले.

याचबरोबर 17,940 भारतीयांच्या पायांमध्ये डिजिटल टॅकर (एंकल मॉनिटर) बसविण्यात आले आहेत. आयसीई त्यांचे लोकेशन चोवीस तास ट्रॅक करत असते. हे लोक निर्धारित लोकेशनच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.

अमेरिकन डिटेंशन सेंटर्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक

अमेरिकेन डिटेंशन सेंटरसंबंधी समोर आलेल्या एका अहवालात मोठे खुलासे झाले आहेत. डिटेंशन सेंटर्समध्ये क्षमतेच्या तुलनेत 109 टक्के लोक अधिक असल्याचे आयसीईने म्हटले आहे. होमलँड सुरक्षा विभागाच्या डाटानुसार डिटेंशन सेंटर्सची एकूण क्षमता 38,521 बेड्सची आहे. तर सध्या या सेंटर्समध्ये 42 हजार अवैध स्थलांतरित आहेत. यातील निम्म्या जणांना मेक्सिको सीमेवर अटक करण्यात आली होती.

भारतीयांच्या हातात बेड्या

अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकेच्या सैन्याचे सी-17 विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या अमृतसर विमानतळावर उतरले आहे. या भारतीयांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या. अमेरिकन बॉर्डर पेट्रोल चीफ मायकल बँक्स यांनी स्वत:च्या एक्स हँडलवर याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत भारतीयांच्या हातात आणि पायांमध्ये बेड्या स्पष्टपणे दिसून येतात. अमेरिकन बॉर्डर पेट्रोल युएसबीपीने अवैध एलियन्सना यशस्वीपणे भारतात परत पाठविले. ही आतापर्यंतची सर्वात दीर्घ डिपोर्टेशन फ्लाइट होती, ज्याकरता सैन्य विमानाचा वापर करण्यात आला. ही मिशन अवैध स्थलांतरितांना परत पाठविण्याची आमची प्रतिबद्धता दर्शविते. जर कुणी अवैध स्वरुपात सीमा ओलांडत असेल तर त्याला परत पाठविण्यात येईल असे बँक्स यांनी म्हटले आहे.

सर्वात धोकादायक तुरुंगात रवानगी

ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी पूर्व क्यूबाच्या ग्वांतानामो बे येथे निर्मित तुरुंगात पाठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या सैन्याचे एक विमान 10 गुन्हेगारांना घेऊन येथे पोहोचले होते. हे सर्वजण गुन्हेगार असून त्यांच्यावर क्रूर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आरोप आहेत अशी माहिती अमेरिकन होमलँड सिक्युरिटी विभागाच्या प्रवक्त्या ट्रिकिया मॅकलॉफिन यांनी दिली आहे.  ग्वांतानामो बे अमेरिकच्या नौदलाचा एक तळ ओ. अध्यक्ष ट्रम्प यांनी येथे 30 हजार अवैध स्थलांतरितांना ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या तुरुंगाला जगातील सर्वात धोकादायक तुरुंग मानले जाते. येथून अमानवयीय यातनांच्या घटना समोर येत असतात.

Comments are closed.