राज्यातील 14 कारखान्यांची धुराडी बंद ! उसाचा तुटवडा; 61 लाख टन साखर उत्पादन
![sugarcane factory](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/sugarcane-factory-696x447.jpg)
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाला. उसाची कमतरता असल्याने आता साखर कारखानेदेखील लवकर बंद होऊ लागले आहेत. चालू हंगामामध्ये आतापर्यंत सुमारे 61 लाख मॅट्रिक टन साखर उत्पादन झाले असून, राज्यातील 14 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत.
यंदा पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम ऊसउत्पादनावर झाला आहे. यंदाच्या हंगामात सहकारी आणि खासगी अशा एकूण 207 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. आतापर्यंत सर्वाधिक 17 लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाली असून, पुणे विभागात 14 लाख टन साखर उत्पादित करण्यात आली आहे. यंदा राज्यात 85 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरला सुरू होणे अपेक्षित असताना विधानसभा निवडणूक व त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे हंगामास तुलनेने महिनाभराचा उशीर झाला. तरीदेखील पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, साखर कारखान्यांना या उसाचे गाळप तातडीने करावे लागत आहे. त्यासोबत सरासरी साखर उतारादेखील कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळेच एकूण साखर उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षाही कमी होणार आहे.
उसाची कमतरता त्याचबरोबर उसाला तुरे आल्यामुळे कारखान्यांपुढे अडचणी आहेत. हंगाम बंद करणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये धाराशिव सहकारी साखर कारखाना, लोकनेते बाबूराव पाटील मोहोळ, सिद्धनाथ सोलापूर, येडेश्वर बार्शी, मातोश्री अक्कलकोट भैरवनाथ शुगर दोन कारखाने, विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी किल्लारी यासह एकूण 14 कारखान्यांचा समावेश आहे. नांदेड विभागातील दोन कारखान्यांनीदेखील धुराडी बंद केली असून, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादनामध्येदेखील घट झाली आहे.
साखर उतारा वाढेना…
■ राज्यात यंदा 99 सहकारी, तर 101 खासगी कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत 66 लाख 76 हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून 60 लाख 96 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी साखर उतारा 9.13 टक्के मिळाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत राज्यात 74 लाख 94 हजार टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून 72 लाख 67हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी सरासरी साखरेचा उतारा 9.7 टक्के मिळाला होता.
Comments are closed.