कोमल, संजीवनी, तेजस यांच्यावर ॲथलेटिक्स मधील पदकांची मदार

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2025  डेहराडून : आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमल जगदाळे, संजीवनी जाधव तेजस शिरसे यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ॲथलेटिक्स मधील पदकांची मदार आहे. पण पदकांची लयलूट करण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार मानला गेलेल्या मैदानी स्पर्धांना शनिवारी येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात प्रारंभ होत आहे.

कोमल जगदाळे ही स्टीपलचेस क्रीडा प्रकारातील अव्वल दर्जाची खेळाडू मानली जात असून, संजीवनी जाधव ही लांब अंतरांच्या शर्यतीत अनुभवी खेळाडू आहे. महिला गटातच सुदेश नाशिक नेहा दाभाडे ऐश्वर्या मिश्रा व अनुष्का कुंभार यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा केली जात आहे.
पुरुष गटात तेजस शिरसे हा हर्डल्स प्रकारातील माहीर खेळाडू आहे. आजपर्यंत त्याने अनेक विक्रम नोंदविले असून भरपूर पदकेही जिंकली आहेत. त्याच्याबरोबरच सिद्धांत थिंगालिया कार्तिक करकेरा, एकनाथ त्रिंबके, जय शहा हे देखील पदकाचे दावेदार आहेत.महिला गटात ऐश्वर्या मिश्रा, अनुष्का कुंभार (दोन्ही ४०० मीटर्स धावणे), संजीवनी जाधव (पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावणे), नेहा दाभाडे (४०० मीटर्स हर्डल्स), कोमल जगदाळे (तीन हजार मीटर्स स्टीपलचेस), सेजल सिंग (दहा किलोमीटर चालणे), सुदेष्णा शिवणकर (२०० मीटर्स धावणे व रिले शर्यत) यांच्या कामगिरी बाबत उत्सुकता आहे.

पुरुष गटात तेजस शिरसे व सिद्धांत थिंगालिया (११० मीटर्स हर्डल्स), कार्तिक करकेरा (पंधराशे मीटर धावणे), एकनाथ त्रिंबके (वीस किलोमीटर चालणे), प्रणव गुरव ( १०० मीटर्स धावणे),रोहन कांबळे (४०० मीटर्स हर्डल्स), जय शहा (२०० मीटर्स धावणे), विवेक गुप्ता (तिहेरी उडी), सिद्धांत पुजारी (तीन हजार मीटर्स स्टीपलचेस) यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त आहे

Comments are closed.