इंडिया आघाडीनेच खंजीर खुपसला, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचं नेमकं कारण समोर; ‘त्या’ 4 हजार म
दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप या पक्षाला जबर धक्का बसला आहे. येथील मतदारांनी दिल्लीतील आप पक्षाचं गेल्या 10 वर्षांतील साम्राज्य उलथवून लावलं आहे. आता येथे भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. दरम्यान, या निवडणुकीत आप पक्षाचा चेहरा असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या निकालानंतर आता त्यांच्या पराभवाचं नेमकं कारण काय? असं विचारलं जात आहे.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं?
दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद लावली होती. त्याचाच परिणाम आता प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी दिसत आहे. कारण येथे भाजपाने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार आप पक्ष फक्त 27 जागांवर पुढे आहे. तर भाजपा एकूण 47 जागांवर आघाडी आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीच्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. म्हणजेच आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपा दिल्लीमध्ये एकहाती सत्ता स्थापन करणार आहे.
अरविंद केजरीवाल यांचाही पराभव
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आप पक्षाचा चेहरा आहेत. या पक्षाने गेल्या तीन निवडणुका तसेच यावेळची निवडणूक अरविंद केजरीवाल यांचा चेहरा समोर करून लढवली. यावेळच्या निवडणुकीत मात्र अरविंद केजरीवाल यांचा चेहरा फारशी कमाल करू शकला नाही. विशेष म्हणजे खुद्द अरविंद केजरीवाल हेदेखील त्यांच्या नवी दिल्ली या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना भाजपाच्या परवेश सिंह यांनी पराभूत केले आहे. ते नवी दिल्ली मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
इंडिया आघाडीनेच केला गेम
भाजपाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते हे इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलेले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी यासारख्या अनेक प्रमुख पक्षांचा समावेश आहे. दिल्लीच्या निवडणुकीत हे सर्व पक्ष एकदिलाने निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्ष मात्र चित्र वेगळेच दिसले. येथे काँग्रेस पक्षाने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्याचाच परिणाम अनेक मतदारसंघांत दिसला. आप पक्षाला याचा चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली या मतदारसंघातही याचा परिणाम दिसला.
4000 मतांचं गणित समजून घ्या
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार आतापर्यंत भाजपाचे परवेश सिंह यांना 28448 मते मिळाल आहेत. अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 24583 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना एकूण 4254 मते मिळाली आहेत. म्हणजेच अरविंद केजरीवाल हे परवेश सिंह यांच्या 3865 मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला 4254 मते मिळाली आहेत. म्हणजेच दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष एकदिलाने निवडणूक लढले असते तर काँग्रेसला मिळणारी मते ही केजरीवाल यांना मिळाली असती आणि त्यांचा नवी दिल्ली या मतदारसंघातून विजय झाला असता.
दरम्यान, आता केजरीवाल यांच्या पराभवानंतर आम आदमी पार्टीला आत्मचिंतनाची गरज असल्याचं राजकीय जाणकार म्हणत आहेत.
हेही वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.