Aaditya Thackeray criticizes Election Commission for losing credibility
स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सात दशके, भारतातील निवडणुकांच्या आयोजनाचा सर्वांना अभिमान वाटत होता. पण आज, आपल्या देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने होत असल्याचा दावा कोणीही करू शकत नाही.
(Aaditya Thackeray Vs ECI) मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धुळधाण उडाली. तर, दुसरीकडे महायुतीने निर्विवाद बहुमत मिळविले. मात्र, महायुतीचा याच विजयाच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या संख्येत गडबड केली असल्याचा आरोप काल, शुक्रवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. (Aaditya Thackeray criticizes Election Commission for losing credibility)
राहुल गांधी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा अभ्यास केला. या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे, असे म्हणायला वाव आहे. विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या कालावधीत महाराष्ट्रात 32 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली. पण लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या अवघ्या पाच महिन्यांत 39 लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या काळातील तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी आम्हाला हवी आहे. कारण, हे नवे मतदार कोण आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. पण निवडणूक आयोग आम्हाला प्रतिसाद देत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
हेही वाचा – Sanjay Raut : राजकारणात असताना दिल्ली जिंकायची, हीच पंतप्रधान मोदींची शेवटची इच्छा – संजय राऊत
सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रौढांची संख्या 9.54 कोटी आहे तर, निवडणूक आयोगानुसार राज्यात 9.7 कोटी मतदार आहेत. मग, महाराष्ट्रातील एकूण प्रौढांच्या तुलनेत मतदारांची संख्या जास्त कशी? त्याचबरोबर, अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ करण्यात आली आहेत. हा आकडा, नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांपेक्षा जास्त असावा, असा आम्हाला संशय आहे. कारण त्याचा निश्चित आकडा समजणार नाही. तर काहींची नावे, एका बुथमधून दुसऱ्या बुथमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. यातील बहुतांश मतदार हे दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, निवडणूक आयोगाने आपली विश्वासार्हता धुळीस मिळाली असल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सात दशके, भारतातील निवडणुकांच्या आयोजनाचा सर्वांना अभिमान वाटत होता. पण आज, आपल्या देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने होत असल्याचा दावा कोणीही करू शकत नाही. निष्पक्ष निवडणुकीत कोणाचा तरी विजय किंवा पराजय होतोच. पण निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या लाजिरवाण्या आणि अपारदर्शक पद्धतीने या प्रक्रियेला संशयाच्या धुक्यातच आणले नाही तर, त्यांच्या मूळ हेतूलाचा हरताळ फासला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Aaditya Thackeray Vs ECI: Aaditya Thackeray criticizes Election Commission for losing credibility)
हेही वाचा – Thackeray vs Modi : विषयांतर करण्यात मोदींचा हात कोणी धरणार नाही, ठाकरेंची घणाघाती टीका
Comments are closed.