ग्लेन फिलिप्सचा तडाखा, शाहीनची धुलाई! शेवटच्या षटकात चाैकार-षटकरांचा पाऊस

आज (08 फेब्रुवारी) शनिवारपासून पाकिस्तानमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झाला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 330 धावा केल्या. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी खूपच महाग ठरला. त्याने त्याच्या 10 षटकांच्या कोट्यात 88 धावा दिल्या. त्याने 17 वर्षांनंतर एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.

खरं तर, शाहीन पाकिस्तानी भूमीवर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारा पाकिस्तानी गोलंदाज बनला आहे. त्याने माजी गोलंदाज सोहेल तन्वीरचा विक्रम मोडला आहे. 2008 मध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तन्वीरने 87 धावा दिल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ माजी अष्टपैलू अब्दुल रझाकचा क्रमांक लागतो. ज्याने 2008 मध्ये भारताविरुद्ध 83 धावा दिल्या होत्या. तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज नावेद उल हसनने 2004 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 82 धावा दिल्या होत्या.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आजच्या सामन्यात शाहीनने तीन विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्याच षटकात सलामीवीर विल यंग (4) बाद केले. शाहीनने 27  व्या षटकात अनुभवी केन विल्यमसनला बाद केले. तसेच 46 व्या षटकात त्याने मायकेल ब्रेसवेलला बाद केले. 48 व्या षटकापर्यंत शाहीनचे आकडे चांगले होते. पण 50 व्या षटकात सामन्याला वेगळे वळण मिळाले. शाहीनने शेवटच्या षटकात 25 धावा दिल्या.

50 व्या षटकात ग्लेन फिलिप्सने शाहीनचा सामना केला. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि नंतरच्या दोन चेंडूंवर षटकार मारले. त्याने चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत फिलिप्सने 74 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 106 धावांचे ऐतिहासिक शतक साजरे केले. तो सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर येऊन पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक करणारा पहिला फलंदाज ठरला.

हेही वाचा-

कटकच्या मैदानावर भारताचा दबदबा, विरोधकांचा पराभव निश्चित! पाहा आकडेवारी
फिलिप्सने पाकिस्तानला ठोकले! शतकी खेळीने शेवटच्या षटकांत सामन्याची दिशा बदलली
विराट कोहलीच्या फिटनेसवर मोठी बातमी! दुसऱ्या वनडेसाठी उपलब्ध?

Comments are closed.