परीक्षण – कणखर प्रवास

>> अनुराधा नेरूरकर

एखाद्या व्यक्तीचा जीवनपट शब्दांत उभा करणे वाटते तितके सोपे नाही. त्यातून ती व्यक्ती हयात नसताना, तिच्या आयुष्यातील घटनांचे जाणीवपूर्वक डॉक्युमेंटेशन केले गेले नसताना, काही उल्लेख, काही जाहिराती, काही परीक्षणे, काही आठवणी आणि त्या व्यक्तीच्या स्वकीयांकडून उपलब्ध झालेली माहिती याच्या आधारावर एका कलाकाराच्या आयुष्याचा कॅनव्हास रंगवणे तर कठीणच आहे. त्यातून तो जीवनपट हा केवळ माहितीपट न वाटता बोलका प्रवास वाटावा अशा प्रकारचे लेखन करणे म्हणजे आव्हानच असते. रवींद्रनाथ पारकर यांनी रंगभूमी व चित्रपटांतील अष्टपैलू कलाकार सुहासजी भालेकर यांचे ‘स्वतःलाच रचित गेलो’ हे शब्दांकित केलेले चरित्र वाचल्यावर त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे याची कल्पना येते.

गिरणगावातील चाळीत राहणारे, आध्यात्मिक वृत्तीचे आणि कडक शिस्तीचे रामचंद्र भालेकर आणि त्यांच्या बहुपेडी कुटुंबाची कहाणी उलगडताना लेखकाने 1930-40 च्या दशकापासूनचा काळ, त्या वेळची सामाजिक परिस्थिती अभ्यासून डोळ्यांसमोर उभा केला आहे. गिरणगावात राहूनही गिरणी कामगार नसलेले, पण एसीसी कंपनीत काम करणारे सुहास भालेकर यांचे वडील (रामचंद्र) इथे आपल्याला भेटतात. त्यांच्या पत्नी अनसूयाबाई, ज्येष्ठ कन्या कृष्णाबाई आणि त्यांच्या पाठीवर जन्मलेले साबाजी म्हणजे सुहास भालेकर यांचे बालपण, चाळीतील मध्यमवर्गीय वातावरण यांचे चित्र हुबेहूब रेखाटले गेले आहे. नाटकात विशेष रस नसतानाही ‘दशावतार’ हे धार्मिक कार्य समजून, पुढाकार घेऊन त्याचे खेळ करणारे त्यांचे वडील आणि ते खेळ पाहताना त्यातील पात्रांची, तो रंगतदार करण्याची प्रामाणिक धडपड आपल्या नकळत अंगी भिनवणारा साबाजी पाहताना लोकनाटय़ातील अभिनयाची बीजे त्याच काळात त्यांच्यात रुजताना आपल्याला दिसतात.

सुहास भालेकर यांचा लोकनाटय़ातील अभिनय आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे असलेले त्यांचे दिग्दर्शन क्षेत्रातील योगदान किती मोठे होते हे लेखकाने टप्प्याटप्प्याने उलगडले आहे. दिग्दर्शन करताना नाटकातील प्रसंग, भूमिका, अभिनय यांचा समन्वय साधत त्यांचा द्रष्टेपणा अधोरेखित करताना त्यांच्या नाटकाबद्दल लिहून आलेल्या परीक्षणाचे दाखले लेखकाने परीक्षकांच्या नावासहित जागोजागी दिले आहेत. संयत अभिनयाने आणि कल्पक दिग्दर्शनाने भालेकर यांनी लोकनाटय़ालाही खूप उंचीवर नेऊन ठेवले. समीक्षकांनीही त्यांची खूप प्रशंसा केली. ‘आंधळं दळतंय’च्या दिग्दर्शनासाठी, त्याच्या प्रभावी शेवटासाठी खुद्द बाळासाहेबांनी त्यांना दिलेली शाबासकीची थाप, प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने दिलेली दाद हे तितकेसे उजेडात न आलेले प्रसंग आपल्याला या पुस्तकात दिसतात.

किरकोळ शरीरयष्टी असलेल्या या माणसाची नीतिमत्ता आणि रंगभूमीवरची निष्ठा किती ‘कणखर’ होती हे प्रत्येक पानातून उलगडते. दिग्दर्शनातील मेहनतीचे योग्य श्रेय मिळाले नसतानाही केवळ रंगभूमी व वैचारिक भूमिकेविषयी प्रामाणिक राहणे पसंत करणाऱया सुहास भालेकर यांच्याविषयीचा आदर वाढतो. मराठी नाटक-सिनेमासोबत हिंदी चित्रसृष्टीतील त्यांचा प्रवेश, महेश भट्ट, अनुपम खेर अशा दिग्गजांकडून त्यांना मिळालेला आदर, खास त्यांच्यासाठी निवडलेली पात्रे, शांतारामबापूंनी दिलेला सन्मान या सर्व गोष्टी त्यांच्यातील कलाकारांची उंची दाखवून देतात.

या पुस्तकामुळे आणखी एक गोष्ट समजते ती म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार स्व. जयंत पवार यांच्याशी त्यांचे असलेले मामाचे नाते.

एक हाडाचा कलाकार, तत्त्वनिष्ठ रंगकर्मी, जबाबदार कुटुंबप्रमुख, वेळ आल्यास निर्भीडपणे सामोरे जाण्याचा बाणा, यश केवळ पैशांत मोजता येत नाही अशी ठाम धारणा अशी वैशिष्टय़े असलेल्या सुहास भालेकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा शब्दांमध्ये मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. प्रभावी शब्दांकन, ओघवती भाषा आणि सलगपणे सांधलेले, बातम्या, जाहिराती, परीक्षणे, प्रसंग यांचे दुवे हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे. नारायण सुर्वे यांच्या सुहास भालेकरांच्या आयुष्याला चपखलपणे बसणाऱया कवितेच्या खालील ओळींनी केलेला शेवटही मनाला चटका लावून जातो.

आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही

उगाच कोणाला सलाम ठोकणे जमलेच नाही

पैगंबर खूप भेटलेत हेही काही खोटे नाही

स्वतःलाही उगीच हात जोडताना पाहिले नाही

वावरलो हरेकातहरेकांना दिसून आलोच नाही

आम्ही असे कसे? असा प्रश्न स्वतःलाही केला नाही

कळप करून ब्रह्मांडात हंबरत हिंडलो नाही

स्वतःलाच रचित गेलोही सवय गेली नाही

पुस्तकाची निर्मिती संवेदना प्रकाशनच्या नितीन हिरवे यांनी अगदी देखण्या स्वरूपात जीव ओतून केली आहे. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ, अनिल गोवळकर यांचे सुलेखन, फोटो व रेखाटने यांचा सुरेख संगम साधला गेला आहे.

[email protected]

स्वतःलाच रचित गेलो

शब्दांकन ः रवींद्रनाथ पार्कर

प्रकाशक शोक प्रकाशन

पृष्ठे ः 208, किंमत: 300रुपये

Comments are closed.