मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनावर अचानक बंदी! पोलीस आणि भक्तांमध्ये रात्रभर चकमक
माघी गणेश जयंतीनिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यास पोलीस आणि पालिकेने मार्वे चौपाटीवर अचानक बंदी घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे मार्वे किनाऱ्यावर आलेल्या गणेशभक्तांना रात्रभर मूर्तीच्या विसर्जनासाठी परिसरात प्रचंड पायपीट करावी लागली. अखेर काही मंडळांनी भव्य मूर्ती मिरवणुकीनंतर पुन्हा मंडपाजवळ आणून झाकून ठेवल्या, तर काही जणांनी मढ चौपाटीवर विसर्जन केले. हिंदूंच्या सणांवर निर्बंध आणण्याच्या या प्रकारामुळे गणेशभक्तांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाचा उत्सव भाद्रपदप्रमाणे माघ महिन्यातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मुंबईत घरगुती आणि अनेक सार्वजनिक मंडळांकडून भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या वर्षी सात दिवस बाप्पाची 1 फेब्रुवारीपासून मनोभावे पूजअर्चा केल्यानंतर शुक्रवार, 7 फेब्रुवारी रोजी सात दिवसांच्या उत्सवातील मूर्तींच्या विसर्जनाच्या मिरवणुका मुंबईभरात निघाल्या. यामध्ये कांदिवली, चारकोप परिसरातून मार्वे चौपाटीवर मिरवणूक काढून सायंकाळनंतर विसर्जनासाठी नेलेल्या मोठ्या पीओपीच्या मूर्तींना कोर्टाची बंदी असल्याचे सांगत पालिका आणि पोलिसांकडून रोखण्यात आले. यामुळे भक्तगण आणि पोलीस-पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाल्याने मोठा गोंधळ उडाला.
नामुष्कीला पालिका, पोलीस जबाबदार
कांदिवली, चारकोप परिसरातून आलेल्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता आले नाही. प्रशासनाकडून फक्त छोटय़ा मूर्तीच विसर्जनासाठी स्वीकारण्यात आल्या. त्यामुळे काही मंडळांना केवळ मोठ्या मूर्तीवर शास्त्र्ाानुसार जलामृत शिंपडून त्या परत आणून झाकून ठेवण्याची नामुष्की आली. पालिका आणि पोलिसांमुळेच ही वेळ आल्याचा संताप मंडळांकडून व्यक्त करण्यात आला.
घातकी निर्णय सरकारने बदलावा
पीओपी सामग्री वापरून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय मूर्तिकारांसाठी घातकी आहे. त्यामुळे मूर्तिकारांच्या व्यवसाय आणि कलेवर गदा येणार आहे. त्यामुळे सरकारने निर्णय बदलावा अशी मागणी मूर्तिकारांच्या वतीने गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी मुंबई प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. सरकारने गणेशमूर्ती निर्मिती आणि त्या मूर्तीचे योग्य प्रकारे विसर्जन कसे करता येईल याचा आराखडा मूर्तिकारांशी चर्चा करून तयार करणे आवश्यक असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
ऐनवेळी पालिकेने कळवल्यामुळेच गोंधळ
माघी गणेशोत्सवाची तयारी अनेक मंडळांकडून दोन महिन्यांपूर्वीच सुरू केली जाते. यामध्ये मोठमोठ्या मूर्तींच्या ऑर्डरसोबत मंडपामध्ये सजावटीलाही सुरुवात केली जाते. असे असताना पालिकेने 6 जानेवारी रोजी पीओपीबंदीचे परिपत्रक जारी केले. अनेक मंडळांना याची माहिती शेवटपर्यंत देण्यात आली नाही. काही ठिकाणी तर चक्क मूर्ती मंडपात आल्यानंतर पोलीस-पालिकेडून पीओपीला बंदी असल्याची नोटीस देण्यात आली. ऐनवेळी दिलेल्या निर्देशामुळेच हा गोंधळ उडाला असून वेळेत निर्देश दिले असते तर सर्वांनी नियम पाळले असते, अशी भूमिका मंडळांकडून मांडण्यात आली.
आता म्हणे परवानगी देणार
मूर्ती विसर्जनाला विरोध केल्यामुळे भक्तगणांमधून तीव्र संताप व्यक्त होत असल्यामुळे आता अकराव्या दिवशी होणाऱ्या विसर्जनासाठी चौपाटीसह नॅशनल पार्कमध्येही मूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
Comments are closed.