विशेष – प्रेम म्हणजे…

>> विश्वस वासकर

प्रेम काय असतं? अळवावरचं मंथरं पाणी असतं. ते डोळय़ांनी बोलली गेलेली हृदयाची भाषा… गालावरली लाली… तळहाताचं चुंबन असतं. स्पर्शाची पालवी उगवणारा वसंताचा हात असतं. मदनानं सोडलेला सुमशर असतं… कधी ओठांवरचा गुलाब, तर कधी रेशमी केसांची माधवी असतं. कुणाच्या तरी वाटेवर डोळे अधरणारं पर्युत्सुक मन असतं. संध्येचं श्यामल पाणी असतं. भावनेच्या अंगात भिडणारं शरीराचं मीलन असतं. ते अनुपमेय असल्यानं देवाघरचं लेणं असतं.

माणूस हा पृथ्वीतलावरील सर्वात महान प्राणी आहे आणि ‘प्रेम’ ही या माणसाला मिळालेली सर्वात श्रेष्ठ अशी देणगी आहे. कधीपासून लाभली ही देणगी त्याला? मला वाटतं, उक्रांतीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात चार पायांवर चालणारा माणूस दोन पायांवर उभा राहिला आणि त्याचे मोकळे झालेले हात प्रेम करायला उपलब्ध झाले तेव्हापासून. ‘हात हे स्पर्शसंवेदनेचं मुख आहे, म्हणून तर त्याला प्रत्येकी पाच-पाच जिभा आहेत.’ कोणत्याही मानवतेवर प्राण्यापेक्षा वेगळे असणारे माणसाचे वैशिष्टय़पूर्ण हात नुसते प्रेम करीत नाहीत, तर प्रेमाच्या कविता लिहितात, चित्र काढतात, वाद्य वाजवितात, शिल्प निर्माण करतात. कैलास लेण्याचा निर्माता कुणाच्या तरी प्रेमात पडला असावा. ताजमहाल निर्माण करणाऱया कलावंतांच्या व्यक्तिगत
प्रेमकहाणीवर आधारित ‘पत्थर का ख्वाब’ मी खूप लहानपणी पाहिला आहे. ललितकलांच्या निर्मितीचं महत्त्वाचं आणि एकमेव कारण जरी प्रेम नसलं तरी कुणाच्या तरी प्रेमात पडल्याशिवाय काही नवं, भव्यदिव्य निर्माण करावं वाटतच नाही. म्हणून तर कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम हा आहे मानवी संस्कृतीचा सारांश!‘

माणसाच्या मनात प्रेमाचे हे अद्वितीय रसायन ऊर्फ केमिकल लोचा कसा तयार होतो, या विषयावर जगभरातल्या सर्व भाषांत अब्जावधी ओळी लिहिल्या गेल्या असतील. नीरज या कवीने हे रसायनशास्त्र थोडक्यात असे मांडले आहे- आधी चंचलतेमध्ये फुलांचं तारुण्य कालवायचं आणि मग त्यात थोडंसं मद्य मिसळायचं. या सरमिसळीतून धुंदीचं जे कॉकटेल तयार होईल ते म्हणजे प्रेम.

खरंच, प्रेम काय असतं? अळवावरचं मंथर पाणी असतं. तरुणपणीच्या रस्त्यावरचं पहिलं मोक्याचं ठिकाण असतं. ते डोळय़ांनी बोलली गेलेली हृदयाची भाषा असतं. प्रेम गालावरली लाली असतं, तळहाताचं चुंबन असतं. ते स्पर्शाची पालवी उगवणारा वसंताचा हात असतं. मदनानं सोडलेला सुमशर असतं, ओठांवरचा गुलाब, प्रेम रेशमी केसांची माधवी असतं. प्रेम कुणाच्या तरी वाटेवर डोळे अधरणारं पर्युत्सुक मन असतं. प्रेम संध्येचं श्यामल पाणी असतं. प्रेम भावनेच्या अंगात भिडणारं शरीराचं मीलन असतं. ते अनुपमेय असल्याकारणानं देवाघरचं लेणं असतं. प्रेम नसणाराचं असणं असतं, असणाराच्या अंगीचं लेणं असतं. मनमुकुराचं वेल्हाळणं असतं. प्रेम एकाच जन्मामध्ये मिळणारे अनेक जन्म असतं आणि मरणाची भीक मागणारे शेकडो मृत्यू असतं. प्रेम ज्यांना मिळतं ते वेदनेने तडफडत असतात; पण त्यांची वेदना दगडाला मिळणाऱया निष्प्रेम चिरंजीवनापेक्षा लाख पटीने श्रीमंत असते!

तारुण्याच्या उंबरठय़ावर भेटलेलं आणि लाभलेलं प्रेम म्हणजे मृगाचा पाऊस. मृगाचा पाऊस आला नाही म्हणून कोणी उशिराच्या पावसावर रागवायचं नसतं. त्याला अधिक-उणं बोलून त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे या त्याच्या सर्व गुस्ताखियाँ माफ करायच्या असतात. बेटर लेट दॅन नेव्हर. ‘पगला घोडा’तली नायिका तिला तिची चिता जळत असताना चितेच्या जवळ गप्पा मारत बसलेल्या माणसांकडून कळते की, आपल्या शेजारी राहणारा म्हातारा आपल्यावर मनोमन प्रेम करत होता! हे कळताक्षणी तिचा मरण्याचा इरादा बदलतो! आता तिला जगायचं असतं. असं अकल्पितपणे, अभावितपणे भेटलं म्हणून काय झालं, प्रेम हे शेवटी प्रेम असतं. ते सफल नाही झालं म्हणून काय झालं… त्याचा ओझरता जरी परीसस्पर्श आपल्या जीवनाला झाला तरी उर्वरित जगण्याला ते अर्थपूर्णता प्राप्त करून देतं.

एक विधवा प्रौढ स्त्राr एका शाळेची मुख्याध्यापिका असते. एके दिवशी त्या शाळेतील एक तरुण शिक्षिका तिच्याकडे तक्रार घेऊन येते, की शाळेतील शिक्षक व मुलं-मुली तिची टिंगल करतात. कारण तिचं कोणावर तरी प्रेम असतं अन् त्यांचं लग्न ठरलेलं असतं. ती मुख्याध्यापिका तिला म्हणते, ‘अगं, यात एवढं रागावण्यासारखं, चिडण्यासारखं काय आहे? अशा प्रसंगांतून तर प्रेम वाढत असतं.’ ती तरुण शिक्षिका म्हणते, ‘तुम्हाला या प्रेमाचा काय अनुभव? तुम्ही तर कधी प्रेम केलं नाही.’

प्रेमातूनच शाळा कशी उभी राहिली याबद्दल मुख्याध्यापिका सांगते, ‘मी बालविधवा होते. एकदा एका लग्नसमारंभात मी गेले होते. सर्वांमध्ये उठून दिसणाऱया एका उमद्या तरुणाला तिथे बघितलं. त्यानेही मला पाहिलं, आमची नजरभेट झाली. मी माझ्या खोलीकडे परतले तेव्हा टेबलावर एक पत्र ठेवलं होतं. त्यात लिहिलं होतं. ‘मी तुला पसंत असेन व तुझी लग्न करण्याची इच्छा असेल तर तू दारात फुलांची माळ घेऊन उभी राहा, म्हणजे मी पुढील बोलणी तुझ्या आईवडिलांशी करीन.’

त्या शिक्षिकेने उत्सुकतेनं विचारलं, ‘पुढं काय झालं मॅडम? तुम्ही लग्न का केलं नाही?’

‘अगं, मला ते पत्र वाचता आलं नाही. त्यावेळी मी निरक्षर होते.’ अन् ती कथा संपते.

‘इज्हारे इश्क’ हा प्रेमातला म्हणून अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जे डोळ्यांतून, वागण्यातून थोडं बहुत कळालेलं असतं ते शब्दात नेमकं व्यक्त करणं जरुरी असतं. असं न करणाऱयांना जन्मभर ‘हृदयात दाटलेलं हृदयात राहिले’ हे गाणं गावं लागतं. स्पर्शाने जाणीवपूर्वक स्पर्श करण्यातून प्रेम व्यक्त करणं तितकंच महत्त्वाचं असतं. पुन्हा एक धोक्याची सूचना! स्पर्श करण्यात फार घाई करणे किंवा फार उशीर करणे या दोन्हींमुळे मामला बिघडू शकतो. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल तसे काही नाही हे कळल्यानंतरही तिच्यावर आपलं प्रेम लादत राहण्याचा अट्टहास हा असंस्कृतपणा, रानटीपणा किंवा विकृती आहे.

प्रेमाच्या क्षेत्रात कोणतीच सक्ती असू शकत नाही. प्रेमाची परिणती विवाहात होणे यासारखं सुदैव नाही. परंतु निरनिराळय़ा कारणाने प्रेम असफलही होऊ शकते. लैला-मजनू, शिरीन-फरहाद, रोमियो-ज्युलियट, हीर-रांझा… सगळी अमर प्रेमं असफलच होती. यांच्या काळात मोबाईल फोन असता तर यांचं प्रेम विफल झालं नसतं.

प्रेम आणि मैत्री परस्परात मिसळणाऱया सीमारेषांबद्दल अरुणा ढेरे यांच्या कवितेत या नात्याविषयी आपल्या एका मित्राशी बोलताना त्या म्हणतात- ‘माझं अर्धवट फुललेलं बोलणं ऐकून तू हसलास, तर तू मर्द असशील, माझ्यासाठी स्वप्न धरायला धावलास तर तू प्रेमिक असशील, स्वप्न झालास तर परमेश्वर असशील, ते स्वप्न हाती देशील तर माझा पती असशील पण…
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)

Comments are closed.