पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना भेटायला उत्सुक आहेत

फ्रान्सच्या दौऱ्यासाठी निर्गमन, 12 फेब्रुवारीला अमेरिकेत जाणार, 13 फेब्रुवारीला चर्चा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आपले ‘परममित्र’ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यास आपण अतिशय उत्सुक आहोत, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांचे रविवारी चार दिवसांच्या विदेश दौऱ्यावर निर्गमन झाले आहे. प्रथम ते फ्रान्सला जाणार असून तेथून परस्पर अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौरा संपवून ते 15 फेब्रुवारीला सकाळी ते भारतात परततील, अशी माहिती देण्यात आली.

पंतप्रधान मोदी 12 फेब्रुवारीला अमेरिकेत पोहचणार असून 13 फेब्रुवारीला त्यांची ‘व्हाईट हाऊस’ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापक चर्चा होईल. या चर्चेत द्विपक्षीय संबंध, धोरणात्मक भागिदारी, शस्त्रास्त्र व्यवहार, तंत्रज्ञान आदानप्रदान, प्रशांत भारतीय क्षेत्रातील धोरण, व्यापारी कर, स्थलांतरितांची परतपाठवणी, एच वन बी व्हिसासंबंधी धोरण, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान धोरण आदी अनेक महत्त्वाचे विषय चर्चेत येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरुन विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली होती. त्याच दूरध्वनी संपर्कात त्यांचा हा अमेरिकेचा दौरा निश्चित करण्यात आला होता. त्याआधी असणाऱ्या फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ तंत्रज्ञान परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. फ्रान्सचे नेते इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा होईल. भारत फ्रान्सकडून आणखी राफेल विमाने खरेदी करू इच्छित आहे. त्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

विजयासाठी अभिनंदन

डोनाल्ड ट्रम्प यांचा गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. त्यानंतर 20 जानेवारी 2025 या दिवशी त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही प्रसंगी त्यांचे अभिनंदन केले होते. आता ट्रम्प यांच्या दुसऱ्या कालखंडात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटणार आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच दृढ होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

ही अमूल्य संधी

अमेरिकेच्या अध्यक्षांची होणारी आपली भेट ही दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ करण्यासाठीची एक नामी संधी आहे. या संधीचा उपयोग दोन्ही देशांच्या लाभासाठी होऊ शकतो. जागतिक राजकारणात समतोल राखण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे, अशा अर्थाचा संदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

संपूर्ण मंत्रिमंडळाला भेटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्याशी चर्चा होण्याच्या आधी अमेरिकेच्या नव्या प्रशासनाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला भेटण्याची शक्यता आहे. ही संभाव्य भेटही महत्त्वाची मानण्यात येत आहे. ट्रम्प यांच्याशी चर्चा होत असताना इलॉन मस्कही तेथे उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. तसेच ते अमेरिकेतील ख्यातनाम उद्योगपती आणि उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनाही भेटण्याची शक्यता आहे.

प्रथम कार्यकाळातील मैत्री

2016 ते 2020 या काळात पहिल्या वेळेला ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दाट मैत्री झाली होती. आता त्याच मैत्रीची पुनरावृत्ती ट्रम्प यांच्या या द्वितीय कार्यकाळात होईल अशी अपेक्षा आहे. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प त्यांच्यासाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजनही करतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असून या दौऱ्यात काही महत्त्वाचे करारही होण्याचा संभव आहे. एकंदर, दौऱ्यासंबंधी उत्सुकता ताणली गेली आहे.

Comments are closed.