नातवाने 500 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेच्या वादाने मारले

हैदराबादमधील घटना : अंगावर 70 वेळा चाकूने वार

सर्कल संस्था/हैदराबाद

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे 86 वर्षीय संस्थापक वेलमथी चंद्रशेखर जनार्दन राव यांची त्यांच्याच घरात हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा नातू किलारू कीर्ती तेजा याला आजोबांच्या हत्येप्रकरणी अटक केली. तसेच हत्येत वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.

जवळपास 500 कोटींच्या मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचा प्रकार उघड झाला असून या हत्या प्रकरणाने हैदराबाद शहर हादरले आहे. एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या बाबतीत घडलेली ही घटना हैदराबादच्या लोकांना धक्का देणारी आहे. तसेच मालमत्तेचे वाद किती टोकाला जाऊ शकतात हे दाखवून देते. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

29 वर्षीय किलारू तेजा याचे गुरुवारी रात्री (6 फेब्रुवारी) जनार्दव राव यांच्याशी मालमत्तेच्या वाटणीवरून भांडण झाले. रागाच्या भरात तेजाने आपल्या आजोबांवर हल्ला करत त्यांच्यावर अनेक वार केले. प्राथमिक तपासात तेजाने आपल्या आजोबांवर 70 पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केल्याचे समोर आले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टची अजूनही प्रतीक्षा आहे. आजोबांची हत्या केल्यानंतर तेजा वेषांतर करून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी अवघ्या एक-दोन दिवसात मुख्य हल्लेखोराला म्हणजेच नातवाला अटक करत या प्रकरणाचा छडा लावल्याचे पंजगुट्टा निरीक्षक बी. शोभन यांनी सांगितले.

तेजाचे शिक्षण अमेरिकेत

हत्येतील मुख्य संशयित म्हणून अटक करण्यात आलेला तेजा हा अमेरिकेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर अलीकडेच हैदराबादला परतला होता. तो हैदराबादच्या पश्चिम कॉरिडॉरमध्ये असलेल्या लँको हिल्स या गेटेड कम्युनिटीमध्ये राहत होता. आजोबांकडून कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत आपल्याशी भेदभाव केला जात असल्याचे त्याला वाटत होते. जनार्दन राव यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तेजा हा सरोजिनी नामक मुलीचा मुलगा आहे. हत्येच्या दिवशी तो संध्याकाळी आपल्या आईसोबत आजोबांच्या घरी गेला होता. तिथे त्याचे आजोबांसोबत वाद झाले आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला. तेजाच्या आईने आपल्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्यावरही हल्ला केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Comments are closed.