मुंबई बंदर, मुंबई महानगरपालिकेचे सलग विजय
मुंबई, दि. ९ (क्री.प्र.)- आपल्या अद्वितीय आयोजनामुळे नेहमीच कबड्डीपटूंच्या आवडीचे मंडळ असलेल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत मुंबई बंदर आणि मुंबई महानगरपालिकेने सलग विजयासह बाद फेरीत धडक मारली तर आयएसपीएल, रुपाली ज्वेलर्सने कडवी लढत देत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कबड्डीप्रेमींना कबड्डीचा दमदार आणि जोरदार खेळ पाहाण्याचे भाग्य लाभले होते. मात्र दुसर्या दिवशी मैदानातून थरार गायब झाला होता. मुंबई महानगर पालिकेने काल ठाणे महानगर पालिकेला हरवले होते तर आज हिंदुजा रुग्णालयाचा ३८-२२ असा सहज पराभव करत सलग दुसर्या विजयासह बाद फेरीत स्थान मिळवले. मुंबई पालिकेच्या विजयात राहुल सवर आणि अल्केश चव्हाण यांनी जोरदार खेळ केला. मुंबई बंदरनेही बाद फेरी गाठताना मुंबई पोस्टलचे आव्हान ४०-३३ असे मोडीत काढले. मुंबई बंदरकडे मध्यंतराला १६-१५ अशी एका धावेची आघाडी होती. मात्र दुसर्या डावात कृष्णा शिंदे आणि चेतन पारधीने वेगवान खेळ करत बंदराला विजयाच्या किनार्यावर नेले.
स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून ज्याच्या खेळाकडे पाहिले जाते. त्या आयएसपीएल (युवा पलटण) संघाने युनियन बँकेचा ३६-१९ असा धुव्वा उडवला. आयएसपीएलने मध्यंतरापूर्वीच १९-१० अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता तर उत्तरार्धात त्यांनी तोच खेळ कायम राखत युनियन बँकेला डोकेच वर काढू दिले नाही. अन्य एका लढतीत रायगडच्या मिडलाईन अॅकॅडमीने रुपाली ज्वलेर्सविरुद्ध २४-२० अशी आघाडी मिळवली होती. मात्र मध्यंतरानंतर रुपाली ज्वेलर्सने मिडलाइनच्या चढाईबहाद्दरांच्या एकापेक्षा एक पकडी करत सामन्यात कमबॅक केले आणि मिडलाइनचे कंबरडेच मोडून काढले. रुपाली ज्वेलर्सने हा सामना ४८-४० असा जिंकत आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याआधी स्वामी समर्थच्या या दिमाखदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई आणि स्पर्धेचे आयोजक आणि आमदार महेश सावंत, शाखाप्रमुख संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला.
महत्त्वाच्या बातम्या-
तलवारबाजीत ड्रायव्हरच्या मुलीचे यश, श्रुती जोशीने जिंकले कांस्यपदक
Ranji Trophy; रहाणेचा शानदार खेळ, मुंबईची सेमीफायनलमध्ये थाटात एंट्री..!
देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५० लाडक्या पैलवान बहिणीं’च्या कुस्त्या
Comments are closed.