टेबल टेनिस मधील महिला गटात महाराष्ट्राला रौप्य, अंतिम सामन्यात पश्चिम बंगालकडून पराभूत
डेहराडून: उत्कंठापूर्ण लढतीत महाराष्ट्राला टेबल टेनिस मधील महिलांच्या सांघिक अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल संघाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला त्यामुळे त्यांना ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
अटीतटीने झालेल्या या लढतीमधील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला सुतीर्था मुखर्जी हिच्याकडून ८-११, ११-६,१२-१४,११-२, ५-११ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महाराष्ट्राची कर्णधार दिया चितळे हिने अहीका मुखर्जी हिच्यावर १२-१०, ११-६, ११-६ असा विजय मिळवित १-१ बरोबरीसह सामन्यातील उत्कंठा वाढविली. एकेरीच्या तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या
तनिषा कोटेचा हिला पोयमाती बैस्या हिच्याकडून ८-११, ७-११, ११-६, ६-११ अशी हार पत्करावी लागली. एकेरीच्या चौथ्या लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला अहिका मुखर्जी हिने ११-८, ११-६, १३-११ असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने हरियाणाचा ३-० असा पराभव केला. त्यावेळी एकेरीच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार दिया चितळे हिने स्नेहा भौमिक हिच्यावर ११-३, १२-१४, ११-८, १२-१० अशी मात केली. शेवटच्या गेम मध्ये दोन गुणांनी पिछाडीवर असलेल्या दिया हिने टॉप स्पीन फटक्यांचा बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. पाठोपाठ महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिने पृथ्वीकी चक्रवर्ती हिचा ११-६,११-२,११-९ असा सरळ तीन गेम्समध्ये पराभव करीत महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचा हिने श्रीदतरी रॉय हिला ११-६, ७-११, ११-७, ११-३, ११-६ असे पराभूत केले आणि
महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुरुष उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने बलाढ्य तेलंगणा संघाला ३-० असे पराभूत करीत सनसनाटी विजय नोंदविला. त्यावेळी महाराष्ट्राकडून जश मोदी याने फ्रेडेल रिफीक याचा ११-६, ११-७, ११-९ असा सहज पराभव केला. त्याने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. पाठोपाठ रेगन अल्बुकर्क याने मोहंमद अली याच्यावर ११-९, ११-९, ११-६ असा सरळ गेममध्ये विजय मिळविला. तिसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या याने स्वरमेंदु सोम याला १०-१२, ११-१, ११-९, ११-३ असे पराभूत केले आणि महाराष्ट्राचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पहिली गेम गमावल्यानंतर सोमय्या याने टॉप स्पिन फटके व प्लेसिंग याचा सुरेख खेळ करीत विजयश्री मिळविली.
महाराष्ट्र संघाचे प्रमुख संजय शेटे, स्मिता शिरोळे , सुनील पूर्णपात्रे यांनी महाराष्ट्र संघास भेट देऊन प्रोत्साहन दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.