माजी पोलिस महासंचालक कुलदीप शर्मा यांना शिक्षा सुनावली
काँग्रेस नेत्यावर हल्ल्याप्रकरणी 41 वर्षांनी निर्णय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातच्या एका न्यायालयाने राज्याचे माजी पोलीस महासंचालक कुलदीप शर्मा यांना 3 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. शर्मा यांना 41 वर्षांपूर्वीचे कच्छचे पोलीस अधीक्षक असताना काँग्रेस नेत्यावर हल्ला करणे आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. भूज येथील न्यायालयाने माजी पोलीस निरीक्षक गिरीश वासवाद यांनाही दोषी ठरवत तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कुलदीप शर्मा आणि वासवदा दोघांनाही भादंविचे कलम 342 अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे.
संबंधित प्रकरण 1984 मधील असून तेव्हा काँग्रेस नेते इब्राहिम मंधारा यांच्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयात कुलदीप शर्मा आणि काही अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. इब्राहिम मंधारा यांचे आता निधन झाले आहे. इब्राहिम मंधारा आणि स्थानिक आमदाराचे प्रतिनिधीमंडळ 6 मे 1984 रोजी भूजच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते, या प्रतिनिधिमंडळाने तत्कालीन पोलीस अधीक्षकांना निर्दोष लोकांऐवजी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा आग्रह केला होता. यादरम्यान शाब्दिक चकमक उडाल्यावर कुलदीप शर्मा यांनी इब्राहिम यांना दुसऱ्या कक्षात नेते सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला होता.
Comments are closed.