कुस्तीत भाग्यश्री फंडला रौप्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती आखाडय़ातही महाराष्ट्राचा दम दिसून आला. महिलांच्या फ्रीस्टाईल 62 किलो गटात आहिल्यानगरची भाग्यश्री फंड ही रौप्य पदकाची मानकरी ठरली. अंतिम लढतीत जखमी झाल्याने भाग्यश्रीला सुवर्ण पदकापासून वंचित रहावे लागले.

रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात पहिल्या दिवशी एकमेव भाग्यश्री फंडने आपले आव्हान अंतिम फेरीपर्यंत कायम राखले. विजयाची हॅटट्रिक करून भाग्यश्रीने अंतिम फेरीत मजल मारली होती. सलामीच्या लढतीत तिने पंजाबच्या स्वप्नावर 8-4 गुणांनी मात केली. उत्तर प्रदेशच्या काशिशला 6-2, हिमाचल प्रदेशच्या खुशी ठाकूरवर 6-0 एकतर्फी विजय संपादन करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत हरयाणाच्या कल्पनाविरुद्द खेळताना पायाला दुखापत झाल्याने तिचा 1-8 गुणांनी पराभव झाला. गत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग्यश्रीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. पुरुष गटाच्या लढतीत महाराष्ट्राचे मल्ल उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकले. आता कांस्य पदकासाठी फ्रीस्टाईल 125 किलो गटात नाशिकचा हर्षद सदगीर, फ्रीस्टाईल 57 किलोत कोल्हापूरचा अक्षय ढेरे व  87 किलो ग्रीको रोमनमध्ये कोल्हापूरचा दर्शन चव्हाण खेळणार आहेत.

Comments are closed.