करंजा-रेवस पुलाच्या प्रकल्प बैठकीत हवशे-नवशे-गवशे, नवापाडा ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धरले फैलावर
![karanja-revas bridge](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/karanja-revas-bridge-696x447.jpg)
करंजा ते रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतूला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सर्वाधिक जमीन उरणच्या नवापाडा ग्रामस्थांची बाधित होत आहे. असे असतानाही बाधित जागेच्या संयुक्त सर्वेक्षणासाठी या गावातील ग्रामस्थांना डावलून संबंध नसलेल्या हवशे, नवशे, गवश्यांना बोलावणी धाडण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या नवापाडा गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरले.
रेवस-करंजा पूल दृष्टीपथास येऊ लागला आहे. मात्र जोपर्यंत शेतकरी, जमीनधारकांना विश्वासात घेऊन सकारात्मक चर्चा होत नाही, मोबदला ठरत नाही तोपर्यंत सर्वेक्षण, मोजणीसाठी ग्रामस्थांनी कडवा विरोध केला आहे. त्यामुळे पुलाच्या जोडरस्त्याचे काम लटकले आहे. त्यातच बाधित शेतकऱ्यांना सोडून एमएमआरडीएचे अधिकारी भलत्याच हवशे, गवश्यांना बोलावून बैठकीचा फार्स करत असल्याने नवापाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आजदेखील सर्वेक्षण, मोजणीसाठी आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नवापाडा ग्रामस्थांना डावलून कामाला सुरुवात केली होती. ही बाब समजताच नवापाडा ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएचे उपअभियंता अनिरुद्ध बोराडे यांची भेट घेत संताप व्यक्त केला.
न्याय्य हक्कासाठी न्यायालयात जाण्याचा दिला इशारा
ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांनी नवापाडा ग्रामस्थांची सर्व्हे नं.22-1 मधील आठ एकराहून अधिक जमीन पुलाच्या जोडरस्त्यासाठी बाधित होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, परंतु असे असताना आमच्या गावकऱ्यांना चर्चा, बैठकीसाठी आमंत्रित केले जात नाही. हा काय प्रकार आहे असा सवाल करत कोळी यांनी प्रकल्पाला ग्रामस्थांचा कधीच विरोध नव्हता. मात्र यापुढे नवापाडा ग्रामस्थांना डावलण्यात आल्यास न्याय्य हक्कासाठी न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Comments are closed.