महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही – संजय राऊत

”महाराष्ट्राचे राजकारण विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय, कोण कोणाच्या टोप्या उडवतंय, कोण कोणाला गुगली टाकतंय आणि कोण स्वत:च हिट विकेट होतंय हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महारष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं ही आमची भावना आहे”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेची भूमिका मांडली. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्यावर बोलताना संजय राऊत यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी दिल्लीतील अखिल भारती मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर देखील सडकून टीका केली. ”महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला.

”ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत जे लोकं खुलेआम बसले आहे. त्यांना अशाप्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे. ही आमची भावना आहे. कदाचित पवार साहेबांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्रातल्या जनतेला हे पटलेलं नाही. आपण ज्येष्ठ नेते आहात. आम्ही आपला आदर करतो. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशा लोकांना आपण सन्मानित करता, अशाने मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण माहित नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं. पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल, ते तुमचं कौटुंबिक नातं आहे, तरिही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला याचं भान राखून आम्ही आपलं पाऊल टाकत असतो, असे संजय राऊत म्हणाले.

”पवारसाहेबांकडे ठाण्याबाबत चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने न्यायचं काम शिवसेनेने केलं. ठाण्याचा विकास सतिश प्रधान यांच्या काळात झाला. ठाण्यात जे तुम्हाला दिसतंय त्या सगळ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या. सतिश प्रधान हे अनेक पदावर होते, त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यांना विकासाची दृष्टी होती. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीरा आले. पवारांना माहिती हवी असेल तर आम्ही आमच्या राजन विचारेंना पाठवतो. एकनाथ शिंदे फार उशीरा आले ठाण्याच्या राजकारणात आणि त्यानंतर ठाणे बिल्डरच्या घशात गेले, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.