औद्योगिक प्रदूषणामुळे ठाणे, नवी मुंबईतील 37 किमीच्या खाड्या काळवंडल्या, मच्छीमार चिंतेत

कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक कंपन्या थेट सांडपाणी सोडत असल्याने नवी मुंबई, ठाणे परिसरातील खाड्या अक्षरशः काळवंडल्या आहेत. याबाबत मच्छीमारांनी आवाज उठवल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून 37 किमीच्या खाड्या प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मच्छीमार चिंतेत आहेत. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

ठाणे, नवी मुंबई परिसरातील बेलापूर, कोपरा, पनवेल, कासाडी, न्हावा-शेवा, घारापुरी, तळोजा, दिवाळे आदी समुद्र खाड्या व उपखाड्या पारंपरिक मच्छीमारीसाठी अत्यंत समृद्ध समजल्या जातात. मात्र औद्योगिक क्षेत्रातून रसायनमिश्रित सांडपाणी मोठ्या प्रमाणावर या खाड्यांमध्ये सोडण्यात येत आहे. या विषारी रसायनांमुळे खाड्यांमध्ये प्रदूषण वाढले असून त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, रायगड जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ही गंभीर बाब मच्छीमारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मच्छीमार संस्था, मच्छीमार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवी मुंबई क्षेत्रीय विभागाचे अधिकारी विशाल मुंडे यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी नंदकुमार पवार, नारायण कोळी, आकाश कोळी आदी सहभागी झाले होते.

वेळीच उपाययोजना करा

दिवाळे खाडी, न्हावा शेवा व सोनारीपर्यंतच्या खाडीपर्यंत केलेल्या संयुक्त पाहणीत विविध प्रकारच्या घरगुती, औद्योगिक सांडपाण्यामुळे सागरी खाड्या प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच समुद्र खाड्यातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. या अहवालात खाड्या प्रदूषित होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे सिद्ध झाले असल्याचा आरोप महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केला आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, अन्यथा पारंपरिक मच्छीमारांच्या न्याय्य हक्कासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवी मुंबई क्षेत्रीय विभागाचे अधिकारी विशाल मुंडे यांनी खाड्यांची संयुक्त पाहणी केल्याचे सांगत तळोजा औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचे नमुनेही घेतल्याची माहिती दिली आहे.

Comments are closed.