CM Devendra Fadnavis on Lakhpati Didi Yoajna in Maharashtra in marathi


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत ही संख्या 25 लाखापर्यंत नेली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने 11 ते 23 फेब्रुवारीदरम्यान येथील वांद्रे-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. (CM Devendra Fadnavis on Lakhpati Didi Yoajna in Maharashtra)

हेही वाचा : Jammu Kashmir Blast : जम्मू – काश्मीरजवळ अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर IED स्फोट, दोन जवान हुतात्मा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’ म्हटले जाते. आज महाराष्ट्रात 11 लाखापेक्षा जास्त ‘लखपती दीदी’आहेत. लवकरच 25 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा सरकारचा संकल्प आहे. याशिवाय नजीकच्या कालावधीत 1 कोटी महिला लखपती दीदी करण्याचा आमचा निर्धार आहे. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहीण योजना, एसटीमध्ये प्रवास सवलत यांसह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी उपस्थित महिलांना दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार

‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘उमेदच्या’ माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेसाठी टप्प्याटप्प्याने मॉल उभारण्यात येतील. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्री साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील 10 जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर 10 उमेद मॉल उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महालक्ष्मी सरस प्रदर्शन 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत

वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाला 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तूंशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी आणि इतर राज्यातील दुर्मीळ वस्तू उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात एकूण 500 पेक्षा जास्त स्टॉल लागले असून त्यापैकी 90 फुड स्टॉल आहेत.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.