BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule on state member registration record


मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपने पुन्हा पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या सदस्यता नोंदणी अभियानात 1 कोटी सदस्य नोंदवून भाजपने नवा विक्रम केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. आता संघटन पर्व कार्यक्रमाच्या अंतर्गत येत्या 15 दिवसांत आणखी 50 लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. (BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule on state member registration record)

हेही वाचा : मराठी : आतापर्यंत वंदनीय असणाऱ्या शरद पवारांवरच राऊतांची टीका, एकनाथ शिंदेचा टोला 

पक्ष सदस्य नोंदणीचा एक कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर भाजपने आणखी 50 लाख सदस्यांची नोंदणी करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी आज, गुरुवारपासून आपण पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप सदस्य नोंदणी अभियानामध्ये ग्रामपंचायत ते संसद स्तरावरचे सर्व लोकप्रतिनिधी, बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष तसेच पक्ष संघटनेच्या सर्व घटकांनी सहभाग घेतला. आता पुढील 15 दिवस 78 संघटनात्मक जिल्ह्यांमधील 792 मंडलांमध्ये प्रभावीपणे संघटन पर्व राबवण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक वाडी, वस्ती, पाडे, गावांपर्यंत पोहोचून सदस्य नोंदणीला वेग दिला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात लवकरच लवकरच दीड कोटी प्राथमिक सदस्य, पाच लाख सक्रीय सदस्य, 1 लाख 186 बूथ अध्यक्ष, 1 हजार मंडल यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

सदस्य नोंदणीशिवाय शासकीय समितीवर नियुक्ती नाही

प्राथमिक सदस्य नोंदणीबरोबरच पाच लाख सक्रिय सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. एका बूथवर पाच सक्रीय सदस्य केले जातील. सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणत्याही शासकीय महामंडळावर, जिल्हा, तालुकास्तरीय शासकीय समितीवर नियुक्ती होणार नाही. बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष अशा सर्वांना सक्रीय सदस्य व्हावे लागणार आहे. डबल इंजिन सरकारमुळेच विकसित महाराष्ट्र होईल, हा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर, विचारांवर जनतेला विश्वास असल्याने इतक्या मोठ्या संख्येने नागरिक भाजपाचे सदस्य होण्यास उत्सुक आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.