गांजा विकणारे, सेवन करणाऱ्यांची कोल्हापुरात धिंड; अमली पदार्थांचा बिमोड करण्यासाठी पोलीस इन अॅक्शन
![kolhapur crime news](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/kolhapur-crime-news-696x447.jpg)
कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या अनेक दिवसांपासून लागलेले गांजाचे ग्रहण सोडविण्यासाठी आता पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पानपट्टीपासून ते थेट शाळेच्या दारापर्यंत गांजा सहज पोहोचू लागल्याने पोलिसांनी गांजा विकणारे आणि सेवन करणाऱ्यांची चिंड काढूनच कारवाईचा बडगा उगारला आहे.
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात गांजासेवन करणारे आणि बाळगणाऱ्यांसंदर्भात 77 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 124 किलो अमली पदार्थ आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. शिवाय तब्बल 108 जणांवर कारवाई करत, 35 लाख 539 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाई करूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा येतो कुठून, याचा शोध सध्या पोलीस प्रशासन घेत आहे.
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीत गांजाचा प्रभाव अधिक असल्याचे वारंवार दिसून आला. आतातर पानपट्टीपासून थेट शाळेच्या दारापर्यंत गांजा सहज उपलब्ध होऊ लागल्याने, गांजाविक्री करणारे व सेवन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी विविध राजकीय व सामाजिक पक्ष, संघटनांकडून पोलिसांकडे करण्यात येत होती. यापूर्वीही गांजाविक्रेत्यांवर कारवाई करूनही गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने, पोलिसांनीही या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गांजाविक्री करणाऱ्यांची धिंड काढण्याचीच मोहीम उघडल्याचे गेल्या आठवड्यापासून दिसून येत आहे. 35 लाखांच्या गांजासह अडीच ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात शहरासह राजारामपुरी, फुलेवाडी, इचलकरंजी, गारगोटी, कणेरी अशा ग्रामीण भागातही विविध ठिकाणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांच्या कारवाईवर नागरिक समाधानी
गेले अनेक महिने कोल्हापुरात उघडपणे गांजा मिळत असल्याने कोल्हापूरकर चांगलेच हैराण झाले होते. पानपट्टीपासून ते थेट शाळेच्या दारापर्यंत गांजा सहज पोहोचू लागल्याने संताप व्यक्त होता. तर गांजा कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणारे मात्र पोलिसांनी गांजाविरोधात घडक मोहीम सुरू केल्यानंतर गायब झाल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या या मोहिमेबद्दल सर्वसामान्य कोल्हापूरकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात येणारा गांजा हा सीमाभागासह पंढरपूर, मिरजमार्गे कोल्हापुरात पोहचत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी होऊ लागली आहे.
Comments are closed.