IND vs ENG: मालिकावीर शुबमन गिल की श्रेयस अय्यर? जाणून घ्या POTS कोणी जिंकले!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली आहे. बुधवारी (12 फेब्रुवारी ) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 142 धावांनी मोठा विजय मिळवला. अहमदाबादच्या मैदानावर सलामीवीर शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने 356 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 34.2 षटकांत 214 धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेत भारताने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला. संपूर्ण मालिकेत गिलने शानदार फलंदाजी केली. तसेच मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने तिन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र, मालिकावीर पुरस्काराच्या शर्यतीत अय्यर मागे पडला.
इंग्लंडविरुद्ध गिलला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा (POTM) पुरस्कारही जिंकला. गिलने तीन सामन्यांमध्ये 86.33 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 259 धावा केल्या. नागपूरमधील पहिल्या सामन्यात त्याने 96 चेंडूत 87 धावा आणि कटकमधील दुसऱ्या सामन्यात 52 चेंडूत 60 धावा केल्या. अहमदाबाद वनडेमध्ये गिलने 102 चेंडूत 112 धावा केल्या. त्याने आपल्या शतकी खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले. अय्यरने 60.33 च्या सरासरीने 181 धावा केल्या. त्याने नागपूरमध्ये 36 चेंडूत 59 धावा आणि कटकमध्ये 47 चेंडूत 44 धावा केल्या. अय्यरने गेल्या सामन्यात 64 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर गिल म्हणाला की, “अहमदाबादमधील शतक त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक होते. मला वाटतं ती एक उत्तम खेळी होती. सुरुवातीला खेळपट्टी थोडी कठीण होती. फास्ट बॉलरना काही मदत मिळाली.” चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी भारत आणि इंग्लंडमधील हा शेवटचा सामना होता. पाकिस्तानमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. इंग्लंडचा पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाशी होईल.
हेही वाचा-
रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास
टीम इंडियाने 14 वर्षांनंतर रचला नवा इतिहास, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी!
आता दुबईत फडकणार तिरंगा; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा जबरदस्त फॉर्म
Comments are closed.