Champions Trophy 2025 – ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड; ‘या’ दोन संघात रंगणार फायनल, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि दुबईच्या धरतीवर होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिंदुस्थान आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेआधी श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

हिंदुस्थानला चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची असेल तर कर्णधार रोहित शर्मा आणि रनमशीन विराट कोहली हे दोघे फॉर्मत असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर कोणत्या दोन संघांमध्ये फायनल खेळली जाईल याबाबतही मुरलीधर आणि आपले मत व्यक्त केले आहे.

इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा याच्या बॅटमधून दणदणीत शतक निघाले आहे. बराच काळानंतर रोहित शर्मा फॉर्ममध्ये आल्याचे दिसते. त्याच्या कामगिरी बाबत विचारले असता मुरलीधरन म्हणाला की, रोहित शर्माने जागतिक स्तरावर आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवलेला आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात की क्लास परमनंट असतो. रोहितने शतक बनवले असून विराटही निश्चितच फॉर्ममध्ये येईल. हिंदुस्थानला ही स्पर्धा जिंकायची असेल तर रोहित आणि विराट फॉर्ममध्ये असायला हवेत.

आशिया खंडातील संघांकडे पाकिस्तान आणि दुबईच्या खेळपट्टीशी जुळवून घेणारे खेळाडू आहेत. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणाऱ्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत फिरकीपटू मोठी भूमिका बजावतील, असेही मुरलीधरन म्हणाला. रिलायन्सने ‘स्पिनर’ नावाचे नवीन एनर्जी ड्रिंक मुलीधरन याच्या हस्ते लाँच केले, यावेळी तो बोलत होता.

हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या संघांकडे चांगले फिरकीपटू आहे. हिंदुस्थानकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे हिंदुस्थानचा संघ फायनलमध्ये पोहोचेल, तर दुसरीकडे पाकिस्तानला घरच्या परिस्थितीचा फायदा होईल आणि या दोन संघांमध्ये फायनल खेळली जाईल, अशी भविष्यवाणी मुरलीधरन याने केली.

Comments are closed.