सत्तेचा गैरवापर करणाऱ्या आमदार सावंतांवर गुन्हा नोंदवा, शिवसेनेकडून पोलिसांना निवेदन

खासगी विमानाने बँकाँकला निघालेल्या ऋषिराज तानाजी सावंत या आमदारपुत्राला थांबविण्यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासनाला वेठीस धरत सत्तेचा गैरवापर करणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. आमदार सावंत यांच्यासह सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिशाभूल करणारी फिर्याद देणाऱ्या महाविद्यालयाच्या विश्वस्तावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या रेखा कोंडे, शहर संघटक संतोष गोपाळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख राजू चव्हाण, अनिल माझिरे, अजय परदेशी, संतोष सावंत, शिवा पासलकर, प्रसाद गिजरे, विलास पवार, संजय साळवी, प्रणव अडकर, नितीन जगताप, मंगेश रासकर, मच्छिंद्र खोमणे आदी उपस्थित होते.

आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बँकॉकला जात असताना आणि मुलगा कॉलेज कॅम्पसमधून स्विफ्ट गाडीतून गेल्याचे समजल्यानंतर देखील आमदार सावंत आणि कुटुंबीयांनी मुलाचे अपहरण नाट्य घडवून आणले. पोलिसांनीही त्यावर तत्परतेने भूमिका बजावली. पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्राचे सरकार एका आमदार पुत्राला शोधण्यासाठी किती तत्परतेने काम करते हे महाराष्ट्राने पाहिले. परंतु, हीच तत्परता सर्वसामान्य माणसाच्या अडचणीच्या वेळी देखील असावी, अशी आशा नागरिकांना आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री यांनीदेखील तातडीने सूत्रे हलवली. मात्र, हा सगळा बनाव असल्याचे उघड झाले आणि आमदार सावंतांचा मुलगा खासगी विमानाने दोन मित्रांसोबत बँकॉकला निघाल्याचे समोर आले. सरकारी यंत्रणेवर झालेला खर्च आमदार सावंतांकडून वसूल करावा, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Comments are closed.