RCB new captain 2025 – आरसीबीचा ‘विराट’ निर्णय, कोहलीला डावलत एकेकाळी UNSOLD राहिलेल्या ‘या’ खेळाडूकडं सोपवलं कर्णधारपद

इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नवीन कर्णधाराची घोषणा केली. विराट कोहली याला डावलत आरसीबीने रजत पाटीदार याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे. एका खास कार्यक्रमामध्ये रजत पाटीदार याच्या नावाची घोषणा करण्यात आली.

रजत पाटीदार याने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या वर्षी त्याने 4 लढतीत फक्त 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2022 ला तो अनसोल्ड राहिला होता. मात्र आयपीएलचा हंगाम सुरू असताना लवनीथ सिसोदिया जायबंदी झाला आणि त्याच्या जागी रजत पाटीदार याची आरसीबीच्या संघात पुन्हा एन्ट्री झाली. पुढे चार वर्षातच त्याचे नशीब फळफळले असून बंगळुरूने थेट कर्णधारपदाची कमान त्याच्याकडे दिली आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत फक्त 27 सामने खेळले आहेत. यात त्याने 158.86 चा स्ट्राईक रेट आणि 34.74 च्या सरासरीने 799 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस याला बंगळुरूने रिटेन केले नव्हते. गेल्या तीन हंगामात त्याने बंगळुरूचे नेतृत्व केले होते. मात्र यंदा त्याला रिलिज करण्यात आले. तेव्हापासून बंगळुरुचे नेतृत्व पुन्हा विराटच्या खांद्यावर येणार अशी शक्यता होती. मात्र बंगळुरूने विराटलाही धक्का देत तरुण खेळाडू रजत पाटीदार याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे. आता विराट सोबत मिळून बंगळुरूला पहिल्यांदा आयपीएल चषक जिंकून देण्याची जबाबदारी रजत पाटीदार याच्यावर आहे.

दरम्यान, रजत पाटीदार याला कर्णधार केल्यानंतर विराट कोहली याने एक व्हिडीओ जारी केला. मी आणि संपूर्ण संघ तुझ्या पाठीशी असल्याचे विराट कोहली रजत पाटीदार याला म्हणतो. ही मोठी जबाबदारी असून मी अनेक वर्ष ती निभावली आहे. आरसीबीला नवीन कर्णधार मिळाला म्हणून मी खूश असून ही मोठी सन्मानाची बाब आहे, असेही विराट म्हणतो. यावेळी कोहलीने चाहत्यांनाही रजत पाटीदार याला पाठींबा देण्याचे आवाहन केले.

आरसीबीला एकदाही इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. 2009, 2011 आणि 2016 साली आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र तिनही वेळेस विजेतेपदाने आरसीबीला हुलकावणी दिली. आता रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरू काय चमत्कार करते हे पहावे लागेल. तो बंगळुरुचा सातवा कर्णधार आहे. त्याच्याआधी राहुल द्रविड, डॅनियल व्हिक्टोरी, शेन वॉट्सन, विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, अनिल कुंबळे यांनी आरसीबीचे कर्णधापद भूषवले आहे.

Comments are closed.