Thackeray and Mahavikas Aghadi will not fund Sarpanch join bjp after fund said nitesh rane
सिंधुदुर्ग : ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या, सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे.
भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे नेते अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, अशोक सावंत, रणजित देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंची काय भीती? पक्षाला गळती का लागलीय? भास्कर जाधवांनी एक-एक मुद्दे सांगितले
नितेश राणे म्हणाले, “जिल्हा नियोजन समिती किंवा सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही. मी माझ्या लोकांना ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढण्यासाठी सांगितले आहे. ज्या गावांत ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही.”
“येणार्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट कायम असायला हवे, त्यासाठी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, कारण निवडून येणारे महायुतीचेच असणार आहेत. चुकून विरोधी पक्षाचे कुणी आलेच तर त्यांनाही आतमध्ये घेऊ. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना मदत करू नये,” असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
नितेश राणे यांच्या विधानावरून नवा वाद उफाळला आहे. सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्विट केले आहे. “विश्वगुरू होण्याची भाषा करणारे पंतप्रधान आणि ऑपरेशन ब्लॅकमेलर राबवणाऱ्या पक्षाने हा व्हिडिओ बघितल्यानंतरही या देशात लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे, यावर भाषणे द्यायला हवेत काय?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या मागचा शुक्लकाष्ठ संपता संपेना! पत्नीने दिलेल्या ‘त्या’ तक्रारीवरून न्यायालयाचा झटका
Comments are closed.