दक्षिण आफ्रिकन फलंदाजाच्या अंगावर धावून जाणं महागात, आफ्रिदीसह 3 खेळाडूंना आयसीसीचा दणका

आयसीसीने शाहीन आफ्रिदीला शिक्षा केली: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंवर आयसीसीने कारवाईचा बडगा उगारलाय. ट्राय सिरीजमध्ये 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगला होता. या सामन्यात आयसीसी आचारसंहिता लेवल 1 चे उल्लंघन केल्या प्रकरणी तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आलाय. यामध्ये शाहिन आफ्रिदी, सऊद शकिल आणि कामरान गुलाम या पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याच्यावर आयसीसी नियम 2.12 चे उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फीस ची 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. याशिवाय कामरान गुलाम आणि सऊद शकील आयसीसी नियम 2.5 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. दोघांना मॅच फीसच्या 10 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

आयसीसीने कारवाई का केली? नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिकेतील (ट्राय सिरीज) तिसऱ्या सामन्याच्या 28 व्या षटकात शाहीन आफ्रिदी आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांच्यात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. यावेळी आफ्रिदीचा संयम सुटला होता आणि तो मॅथ्यूकडे वाद घालण्यासाठी अंगावर धाऊन गेला . यानंतर पुढच्याच चेंडूवर मॅथ्यू ब्रिट्झके एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान आफ्रिदीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला आणि एकमेकांच्या अंगावर गेले. यानंतर 29 व्या षटकात टेंबा बावुमा धावबाद झाला. यादरम्यान कामरान गुलाम आणि सौद शकील आनंद साजरा करण्यासाठी बावुमा जवळ पोहोचले. दोन्ही खेळाडूंनी बावुमाच्या जवळ जात स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बावुमाने खिलाडूवृत्ती दाखवली आणि शांतपणे पॅव्हेलियनमध्ये परतला.

पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पाकिस्तानने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 14 फेब्रुवारीला फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 352 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा सामना करताना मोहम्मद रिझवानने नाबाद 122 धावांची खेळी केली. याशिवाय सलमान आघाच्या 134 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 49 षटकांत 6 गडी राखून सामना जिंकला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Rajat Patidar Captain RCB : आरसीबीच्या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित! कर्णधार बदलताच विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला….

अधिक पाहा..

Comments are closed.