अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यावरही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार;तज्ज्ञांचे मत

अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स 8 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. त्यांची सुकलेली त्वचा आणि कमकुवत शरीर पाहून डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे. आता 12 फेब्रुवारीला सुनीताच्या परतण्याचा प्लॅन निश्चित झाला आहे. 12 मार्च रोजी त्यांना पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. अवकाशात तब्बल 280 दिवस घालवल्यानंतर सुनीता यांच्या आयुष्यात अनेक बदल होणार असून त्यांना सावरण्यास बराच काळ लागू शकतो. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबतही डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

पृथ्वीचे वातावरण पृथ्वीपासून आकाशाच्या दिशेने 100 किमी अंतरावर आहे. अंतराळ स्थानकापासून पृथ्वीवर येताना सुनीता आणि बुच यांचे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल, ज्याला ‘रिएंट्री’ म्हणतात. ही प्रक्रिया सर्वात धोकादायक आणि घातक ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, सुनीता पृथ्वीवर परतल्यानंतरही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी वर्तवली आहे.

पृथ्वीवर चालणे, धावणे, उठणे आणि बसणे हे आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्नायूंचा वापर आणि हालचाल होते. पृथ्वीवर आपले स्नायू नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध कार्य करतात. मात्र, अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने काम करण्यासाठी स्नायूंवर जास्त ताण येत नाही. गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळवीर तेथे तरंगत असतात. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने स्नायू कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाडांची घनता दरमहा 1 टक्के कमी होते. याचा विशेषतः पाय, पाठ आणि मान यांच्या स्नायूंवर परिणाम होतो. यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यात अडचण येते.

पृथ्वीवर परतल्यानंतर, अंतराळवीरासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामान्य जीवनात परतणे हे सर्वात मोठे आव्हान असते. कोणत्याही अंतराळवीराला सामान्य होण्यासाठी साधारणपणे 45 दिवस ते काही महिने किंवा कधी कधी एक वर्षही लागते. ते अंतराळात किती काळ असतात, त्यावर हे अवलंबून असते. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरात अनेक बदल होतात. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने आपल्याला पायांची गरज नाही असे वाटू लागते. अशा परिस्थितीत पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि परत सामान्य जीवनात परतणे आव्हान असते. यासाठी डॉक्टर आणि शारीरिक तज्ज्ञांकडून रिकव्हरी ट्रेनिंग घ्यावी लागते. स्नायू आणि हाडे सावरण्यासाठी अनेक महिने व्यायाम करावा लागतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले. सुनीता या तब्बल 8 महिने अंतराळात असल्याने पृथ्वीवर परतल्यानंतरही त्यांना अनेक अडचणींचा सामना कारवा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.