हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये आज ‘रन’संग्राम! रोहितची सेना सेमीफायनल गाठणार की पाकिस्तान आव्हान राखणार?

हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन क्रिकेटवेडय़ा देशांमधील क्रिकेटची मॅच म्हणजे टेन्शन, खुन्नस, थरार, राडा, शाब्दिक खडाजंगी… जिंकलो तर महाजल्लोष अन् हरलो तर शिव्यांची लाखोली… आणि असं बरंच काही बघायला मिळतं… अहो, मग उद्या, 23 फेब्रुवारी रोजी ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हा ‘रन’युद्धाचा थरार, टेन्शन अनुभवण्यासाठी दुपारपर्यंत आपापली कामे उरपून सज्ज व्हा. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना अन् चाहत्यांना एकमेकांविरुद्धचा पराभव पचवायला अवघड असतो. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यानच्या क्रिकेट लढतीत फलंदाजांच्या तळपत्या तलवारी आणि गोलंदाजांच्या मुलुखमैदानी तोफा एकमेकांना भिडतात तेव्हा त्याचे रूपांतर आपोआप ‘धर्मयुद्धा’त होते, हे सर्वश्रुत आहे. म्हणून या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीकडे फक्त उभय देशांचेच नव्हे, तर अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेले असणार एवढं नक्की.

यजमान अन् गतविजेत्या पाकिस्तानचा सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने धुव्वा उडविला, तर दुसरीकडे टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारत आपल्या मोहिमेचा धडाकेबाज प्रारंभ केला. आता रोहित शर्माची सेना पाकिस्तानची दाणादाण उडवून  स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देण्यासाठी उत्सुक आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानसाठी स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी ही लढत म्हणजे ‘करा किंवा मरा’ अशा स्वरूपाची असेल. गतवेळी म्हणजे 2017 च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या फायनलमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान फायनल झाली होती. मोहम्मद रिझवानची सेना लंडनमधील त्या फायनलच्या विजयाची प्रेरणा घेऊन उद्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उतरेल. याचबरोबर पाकिस्तानला चारीमुंडय़ा चीत करून गटफेरीतच त्यांना बॅगा भरायला भाग पाडून गत पराभवाचे उट्टे काढण्यासाठी टीम इंडियादेखील मैदानावर जिवाचे रान करताना दिसेल.

टीम इंडिया फॉर्मात

कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार शुभमन गिल ही सलामीची जोडी फॉर्मात परतल्याने पाकिस्तानचे टेन्शन नक्कीच वाढलेले असेल. फक्त विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे, एवढाच काय तो हिंदुस्थानसाठी चिंतेचा विषय असेल. मात्र श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्यासह हार्दिक पंडय़ा व रवींद्र जाडेजा या अष्टपैलू जोडीमुळे हिंदुस्थानला फलंदाजीची फारशी चिंता नसेल. कारण पुलदीप यादव हा अखेरचा फलंदाजही टीम इंडियासाठी संकटमोचक ठरू शकतो.

Comments are closed.