मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी वापरलेला वन फंड

उत्तराखंडमध्ये कॅगचे ताशेरे, निधी गैरवापर उघड

वृत्तसंस्था / डेहराडून

उत्तराखंडमध्ये प्रशासकीय निधीचा दुरुपयोग करण्यात आल्याचे कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. वनविकासासाठी राखीव असणाऱ्या निधीतून मोबाईल, स्मार्टफोन आणि लॅपटॉपची खरेदी करण्यात आल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. कॅगचा हा अहवाल वर्ष 2021 ते 2022 या कालावधीतील आहे.

हा अहवाल उत्तराखंडच्या विधानसभेत शनिवारी मांडण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला त्या राज्यात शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. कामगार कल्याण मंडळाने 607 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या अनुमतीशिवायच अन्य खरेदीसाठी वळविल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पैशाचा दुरुपयोग करण्यासाठी वनविभाग विकासाचे नियमही डावलण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या निधीचाही असा दुरुपयोग करण्यात आला आहे. वनीकरणासाठी राखून ठेवण्यात आलेले 14 कोटी रुपये योग्य प्रक्रिया न सांभाळता परस्पर अन्य कामांसाठी वळविण्यात आले आहेत. या पैशातून स्मार्टफोन, लॅपटॉप, रेफ्रीजरेटर्स आणि इतर साधने विकत घेण्यात आली आहे. सरकारी इमारतींच्या नूतनीकरणासाठीही हा पैसा वळविण्यात आला आहे. यामुळे वृक्ष तोडीमुळे ऱ्हास झालेल्या वनभूमीचे पुन्हा वनीकरण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आला आहे, असे ताशेरे कॅगने ओढले आहेत. राज्य सरकारने यावर कृती अहवालही सादर केला.

केंद्राच्या आदेशाचा विपर्यास

उत्तराखंड राज्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी वनभूमीचा उपयोग करण्याची अनुमती केंद्र सरकारने दिली होती. तथापि, या संदर्भात संबंधित क्षेत्राच्या जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अधिकार देण्यात आले होते. केंद सरकारच्या या आदेशाचा विपर्यास करण्यात आला असून नियमबाह्या पद्धतीने कामे केली जात आहेत, असे निरीक्षण या कॅगच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

रोपट्यांचे आयुष्य कमी

राज्याच्या वनीकरण कार्यक्रमावरही कॅगच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वनीकरण कार्यक्रमात ज्या रोपट्यांची लागवड केली जाते, ती रोपटी फार काळ जगत नाहीत. त्यामुळे वनीकरणासाठी खर्च करण्यात येणाऱ्या पैशाचा अपव्यय होत आहे. राज्य सरकारने चांगल्या गुणवत्तेची रोपे आणावीत किंवा निर्माण करावीत अशी सूचनाही या अहवालात करण्यात आली आहे.

Comments are closed.