7 प्रकल्पांसाठी 750 दशलक्ष डॉलर्स प्राप्त झाले
अमेरिकेकडून आर्थिक सहाय्य : अर्थ मंत्रालयाने दिली माहिती : निवडणुकीसाठी एकही पैसा नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या (युएसएड) फंडिंगच्या वादादरम्यान अर्थ मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. 2023-24 आर्थिक वर्षात अमेरिकन संस्थेने 75 कोटी डॉलर्सचे 7 प्रकल्पांमध्ये फंडिंग केले. परंतु यातील कुठलाही प्रकल्प निवडणूक किंवा मतदान वाढविण्याशी निगडित नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्वत:च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
सद्यकाळात भारत सरकारसोबत भागीदारी अंतर्गत अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने (युएसएड) 7 प्रकल्पांसाठी 75 कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य केले आहे. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या 7 प्रकल्पांच्या अंतर्गत युएसएडकडून एकूण 97 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 825 कोटी रुपये) दायित्व निर्माण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विषयक विभागाने अहवालात प्रकल्पांची माहिती देखील दिली आहे. याच्या अंतर्गत युएसएडने कृषी अन् अन्नसुरक्षा कार्यक्रम, जल, सफाई अन् आरोग्य, नूतनीकरणीय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्याशी निगडित प्रकल्पांसाठी वित्तसहाय्य केले आहे. तर मतदान वाढविणे किंवा निवडणुकीशी निगडित कुठल्याही कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य केलेले नाही. युएसएडने वन आणि हवामान अनुकूल कार्यक्रम तसेच ऊर्जा दक्षता तंत्रज्ञान व्यावसायीकरण अणि नवोन्मेष प्रकल्पासाठी वित्तसहाय्याचे आश्वासन दिले आहे. 1951 मध्ये भारताला अमेरिकेकडून मदत मिळण्यास सुरुवात झाली होती. युएसएडकडून आतापर्यंत भारताला 555 प्रकल्पांसाठी 1700 कोटी रुपयांची मदत मिळाली असल्याचे अहवालात नमूद आहे.
ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे वाद
भारतात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आम्ही 2.1 कोटी डॉलर्स देण्याची काय गरज आहे? बिडेन हे भारतातील निवडणुकीत अन्य कुणी निवडून यावे अशी इच्छा बाळगून होते असे वाटते. आम्ही याविषयी भारत सरकारला कळविणार आहोत. भारताकडे आधीच खूप पैसा आहे. तो सर्वाधिक कर आकारणारा देश आहे. आम्ही अत्यंत अवघड स्वरुपात त्यांच्या बाजारपेठेत स्वत:ची उत्पादने पाठवत आहोत, कारण तेथे शुल्क अधिक आहे. भारत आणि त्याच्या पंतप्रधानांचा मी आदर करतो, परंतु भारताच्या निवडणुकीत 2.1 कोटी डॉलर्सचे फंडिंग देण्याचा अर्थ काय? अमेरिकेतील मतदानाची टक्केवारी काय आहे असे प्रश्नार्थक विधान ट्रम्प यांनी केले होते. ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारतात राजकीय वाद उभा ठाकला आहे.
भारताकडून चिंता व्यक्त
ट्रम्प प्रशासनाने जी माहिती समोर आणली आहे ती चिंताजनक आहे. भारत सरकार याप्रकरणी चौकशी करत आहे. जर यात सत्य असेल तर यात कोण सामील होते हे देशाला जाणण्याचा हक्क आहे. युएसएडला भारतात चांगल्या कामांसाठी अनुमती देण्यात आली होती, परंतु याच्या आड गैरप्रकार सुरू होत असतील तर चौकशी आवश्यक असल्याचे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी काढले आहेत.
काँग्रेसकडून आरोप
युएसएड फंडिंगच्या वादादरम्यान काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. अमेरिकेतून खोट्या बातम्या फैलावणे आणि देशविरोधी कार्य करण्याचा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार भारताचा अपमान करत असताना सरकार गप्प का आहे याचे उत्तर पंतप्रधान मोदी आणि विदेशमंत्री जयशंकर यांनी द्यावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Comments are closed.