विक्रमगडमध्ये तिखट मिरचीचा ‘गोडवा’, दर आठवडा 1 टन उत्पादन; एक एकरात केली किमया

काळ्या आईची योग्य ती सेवा केली तर हातात भरभरून दान पडते याची प्रचिती विक्रमगड येथील शेतकऱ्याने घेतली आहे. कुंझें गावातील रहिवासी राजू दुमाडा यांनी एक एकरात मिरचीची अडीच हजार रोपे लावली. पाण्याचे नियोजन, मेहनत आणि मशागत यामुळे दर आठवड्याला एक टन उत्पादन मिळत असल्याने तिखट मिरचीला गोडवा आला आहे. त्यांनी अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. वाफे पद्धतीचा राजू यांनी अवलंब केला असून त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी येत आहेत.
तालुक्यातील कुंझें गावातील दुमाडपाड्यात राजू दुमाडा हे शेतकरी राहतात. जानेवारी महिन्यात दुमाडा यांनी एक एकरमध्ये अडीच हजार मिरचीची रोपे लावली. प्रत्येक रोपामध्ये पुरेसे अंतर ठेवले. योग्य मशागत, खते आणि पाण्याचे नियोजन केले. साधारण दीड महिन्यात मिरचीचे उत्पादन मिळू लागले. आठवड्याला एक टन मिरचीचे उत्पन निघते. वाशी येथील बाजारात मिरचीची विक्री केली जाते. मिरचीला बाजारात प्रतिकिलो 50 ते 60 रुपये भाव आहे. वाशीतील व्यापारी मिरची घेण्यासाठी गावात येत असल्याने वाहतुकीचा खर्च होत नाही. औषधे, सेंद्रिय खते, मजुरी मिळून 50 ते 60 हजारांचा खर्च आला.
दिवसाआड रोपांना पाणी…
गेल्या तीन वर्षांपासून मी मिरचीची शेती करतो. यावर्षी दयाल फर्टिलायझर्सची खते वापरली. कृष्णा काटकरी यांनी या खताची माहिती दिली. त्यामुळे यंदा चांगला फायदा मिळाला असून उत्पादन वाढले आहे. उष्णता जास्त असल्याने दोन दिवसातून एकदा पाणी द्यावे लागते असे शेतकरी राजू दुमाडा यांनी सांगितले
Comments are closed.