Sanjay Raut letter to Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal President Usha Tambe after Neelam Gorhe allegations


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ज्यामुळे संतापलेल्या खासदार संजय राऊतांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत धक्कादायक विधाने केली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहिले आहे. संमेलनाच्या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला, असल्याचे राऊतांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे. (Sanjay Raut letter to Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal President Usha Tambe after Neelam Gorhe allegations)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांबाबतचे पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री उदय सामंत आणि पत्रकार राजीव खांडेकर यांना टॅग केले आहे. राऊतांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (98 वे) दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन.” असे त्यांनी पत्राच्या सुरुवातीस म्हटले आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : 8 मर्सिडीजच्या पावत्या दाखवा, गोऱ्हेंच्या आरोपांवर राऊतांचे आव्हान

खासदार राऊतांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, “दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

तसेच, “दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोन्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी.” अशी मागणीच खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर, “नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.” असेही यावेळी राऊतांनी पत्राच्या माध्यमातून म्हटले आहे.





Source link

Comments are closed.