Sushma Andhare files defamatory case against Neelam Gorhe in Mercedes case


शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अत्यंत बेताल वक्तव्य केले. सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

(Shiv Sena UBT) मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर साधारणपणे वर्षभराने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. एखादे पद मिळविण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. त्यावरून आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. नीलम गोऱ्हे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कडाडून हल्ला करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आता नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. (Sushma Andhare files defamatory case against Neelam Gorhe in Mercedes case)

राजधानी दिल्लीमध्ये अलीकडेच 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आरोप केला. ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की, एक पद मिळायचे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला होता.

हेही वाचा – मराठी : ‘एक महिला काय बोलली तुटून पडलाय? आम्ही जास्त खोलात गेलो, तर…’ शिंदेंच्या मंत्र्याचा ठाकरेंना सेनेला इशारा

यावरून सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अत्यंत बेताल वक्तव्य केले. सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांचे हे बेताल वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे. महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांनी जीवाचे रान करून जो पक्ष उभा केला, त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय, साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी असल्याचे सांगत, पक्षाची प्रवक्ता आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून…; ठाकरे गटाकडून खळबळजनक आरोप



Source link

Comments are closed.