सिल्कीरा बोगदा टीम बचाव ऑपरेशनमध्ये सामील होतो

तीन दिवसांपासून अडकलेल्या 8 कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न सुरूच : चिखलामुळे मदतकार्यात अडथळा

सर्कल संस्था/हैदराबाद

तेलंगणातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगद्यात 48 तासांहून अधिक काळ आठ लोक अडकले आहेत. चिखलामुळे मदत आणि बचावकार्यात अडथळा येत आहे. भारतीय लष्कराचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

याचदरम्यान आता मागील वर्षी उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून कामगारांना यशस्वीरित्या वाचवणाऱ्या पथकातील सहा सदस्य तेलंगणामध्ये पोहोचले आहेत. सदर टीमचे सदस्य बचावकार्यात गुंतले आहेत. त्यांच्या दिमतीला लष्कराने सिकंदराबाद येथील बायसन डिव्हिजनचे इंजिनिअर टास्क फोर्स तैनात केले आहे.

भारतीय हवाई दल आणि नौदलाचे पथकही बचावकार्यात सहभागी आहेत. विशाखापट्टणमहून तीन हेलिकॉप्टरमधून लष्कराच्या तुकड्या श्रीशैलमला पाठवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) कर्मचारी बोगद्याच्या आत 14 किलोमीटर अंतरावर बोअरिंग मशीनपर्यंत पोहोचले आहेत. परंतु चिखल आणि ढिगाऱ्यांमुळे कामात अडथळा येत आहे. बोगद्याचा सुमारे 2 किमी भाग पाण्याने भरलेला आहे. सुमारे 200 मीटर परिसरात चिखल आणि दगडांचा ढीग असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोको ट्रेन बिघडली

सध्या 300 हून अधिक कर्मचारी मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत. अधिक क्षमतेच्या मोटारींच्या मदतीने बोगद्यात भरलेले पाणी काढले जात आहे. याचदरम्यान, बोगद्याच्या आत जाणारी लोको ट्रेन देखील 11 किमी आत बिघडली. यामुळेही मोहिमेत अडथळा येत आहे. ट्रेन दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी आणि जुपाली कृष्णा राव बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. बोगद्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच आहे.

तेलंगणातील नागरकुर्नूल जिह्यात 44 किमी लांबीचा बोगदा बांधला जात आहे. या बोगद्यातून सुमारे 14 किमी आत पाणी गळत होते. कामगार आणि अभियंत्यांची एक टीम ते थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर बोगद्याचा सुमारे तीन मीटर लांबीचा भाग कोसळल्यामुळे 8 कामगार आतील भागात अडकले आहेत. आत अडकलेल्यांमध्ये दोन अभियंते, दोन मशीन ऑपरेटर आणि उर्वरित चार कामगार आहेत. हे सर्व लोक झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. अपघाताच्या वेळी घटनास्थळी एकूण 50 हून अधिक लोक उपस्थित होते. मात्र, उर्वरित लोक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. अपघाताच्या चार दिवस आधी बोगदा बांधण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले होते.

300 कर्मचारी मोहिमेचा भाग

एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या दोन तुकड्या मदत आणि बचावकार्यात गुंतल्या आहेत. एकूण 300 कर्मचारी या मोहिमेचा भाग आहेत. एनडीआरएफने श्वान पथकही तैनात केले आहे. मोहिमेत एंडोस्कोपिक आणि रोबोटिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. कॅमेऱ्यांच्या मदतीने बोगद्याच्या आत काय चालले आहे ते पाहिले जाईल. उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगदा दुर्घटनेतही या कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला होता.

Comments are closed.