आंबेडकरच्या फोटोवर दिल्लीत राजकीय संघर्ष
छायाचित्र काढल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप, भाजपने छायाचित्रासह फोटो केला प्रसिद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रावरून भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यात दिल्लीत वाद भडकला आहे. दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी त्यांच्या कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीकारक भगतसिंग यांची छायाचित्रे काढली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. मात्र, भारतीय जनता पक्षाने तो फेटाळला असून ही छायाचित्रे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जशीच्या तशी आहेत, हे स्पष्टपणे दाखविणारे छायाचित्रच प्रसिद्ध केले आहे.
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतीशी मारलेना यांनी हा आरोप केला होता. आपण मुख्यमंत्री होतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे आपल्या कार्यालयात लावली होती. पण आता हे कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर त्यांनी ही छायाचित्रे काढून टाकली आहेत. यावरुन भारतीय जनता पक्ष कसा दलित विरोधी आणि शीख विरोधी आहे, हे सिद्ध होते, अशी टिप्पणीही त्यांनी सोमवारी केली होती. मारलेना यांनी यासंबंधातील छायाचित्रे प्रसिद्ध करत हा दावा केला होता. भारतीय जनता पक्षाने आपला खरा रंग दाखविला आहे. सत्ता हाती आल्याबरोबर हा पक्ष गुण उधळू लागला आहे, अशी टीका त्यांनी केली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला होता.
भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाचा आरोप छायचित्रांनीच खोडून काढला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली नाहीत. ती जशीच्या तशी आहेत, असे प्रतिपादन या पक्षाच्या वतीने करण्यात आले. ही छायाचित्रे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जशीच्या तशी आहेत, हे दर्शविणारी छायाचित्रेही या पक्षाच्या वतीने ‘एक्स’वर प्रसारित करण्यात आली आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार भगतसिंग, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महात्मा गांधी आदी महनीय व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे आहेत. केवळ त्यांचे स्थानपरिवर्तन करण्यात आले आहे. या घटनेचे आम आदमी पक्ष भांडवल करीत असून दिल्लीच्या निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या या पक्षाने आता भारतीय जनता पक्षाची विनाकारण बदनामी करण्याचे कारस्थान रचले आहे. याच कारस्थानाचा भाग म्हणून आम आदमी पक्षाकडून असा खोटा प्रचार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने केले आहे. याचा पुरावा म्हणून पक्षाने दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग आणि द्रौपदी मुर्मू तसेच महात्मा गांधी यांच्या छायाचित्रांसह उभे असलेले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
गुप्ता यांचा आपवर घणाघात
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या संदर्भात आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठविली आहे. आम आदमी पक्षाचे हे कारस्थान आहे. भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर आणत आहे. त्यामुळे तो पक्ष धास्तावला असून त्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राचा मुद्दा हेतुपुरस्सर उकरुन काढून खोटे दावे या पक्षाकडून करण्यात येत आहेत. निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने आता या ‘आप’दा लोकांना काही काम राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून हा रडीचा डाव खेळला जात आहे. खोटे आरोप केले जात आहेत. मात्र, त्यामुळे भारतीय जनता पक्ष कोणत्याही दबावात येणार नाही. आम्ही आम आदमी पक्षाला उघडे पाडण्याचे आमचे काम करीत राहू, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांनी सोमवारी केले आहे. दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाला सत्तेतून बाहेर केले होते. विधानसभेच्या 70 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळाल्या होत्या. आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले होते.
Comments are closed.