रायगड जिल्हा परिषदेत ‘मिस्टर घोटाळे’, दोन साथीदारांसह बालविकास सेवा योजना प्रकल्पात चार कोटी 12 लाखांचा घोटाळा

कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार रायगड जिल्हा परिषदेत घडला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा अलिबाग उपविभागात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून 1 कोटी 23 लाख रुपयांचा गैरव्यवहार वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने केला होता. आता याच नानाचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. आणखी दोन साथीदारांसह बालविकास सेवा योजना प्रकल्पात चार कोटी 12 लाखांचा घोटाळा त्याने केला आहे. ‘मिस्टर घोटाळे’ जिल्हा परिषदेची तिजोरी राजरोस लुटत असताना वरिष्ठ अधिकारी, ऑडिटर काय झोपा काढत होते का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे याने कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून पाणीपुरवठा अलिबाग उपविभागात गैरव्यवहार केला होता. ही बाब इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करताना जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. यांनतर ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. डॉ. भरत बास्टेवाड यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने कसून चौकशी करीत पाणीपुरवठा विभागात 1 कोटी 23 लाख 21 हजार 499 रुपये तर अलिबाग बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागात नाना कोरडे, कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांनी 4 कोटी 12 लाख 34 हजार 771 रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा अहवाल सादर केला होता.
तिघांविरोधात गुन्हा; एकाला बेड्या
नाना कोरडे याने दोन साथीदारांच्या सहाय्याने अलिबाग बालविकास सेवा योजना प्रकल्पात 4 कोटी 12 लाख 34 हजार 771 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. पाणीपुरवठा व बालविकास विभागातील गैरव्यवहारप्रकरणी नाना कोरडे तसेच कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नाना कोरडेला अटक केली असून या तिघांनाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.
कोरडेची भ्रष्ट कारकीर्द
ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत होण्याआधी कोरडे हा अलिबाग बालविकास सेवा योजना प्रकल्प येथे कार्यरत होता. बालविकास सेवा योजना प्रकल्पात नाना कोरडे, कनिष्ठ सहाय्यक ज्योतीराम वरोडे, कनिष्ठ सहाय्यक महेश मांडवकर यांनी मिळून 4 कोटी 12 लाख 34 हजार 771 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
Comments are closed.