पाऊस अन् दक्षिण अफ्रिकेचं दुदैवी नाते; पावसामुळे 3 वेळा आयसीसी स्पर्धेतून बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला (South Africa Cricket Team) क्रिकेटमध्ये ‘चोकर्स’ म्हटले जाते. बाद फेरीत वारंवार बाहेर पडणे ही आफ्रिकन संघाची जुनी सवय आहे. दक्षिण आफ्रिका सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025) ग्रुप बी च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, परंतु उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिकेचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र काल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे उपांत्यफेरीत पोहचण्यासाठी दक्षिण अफ्रिकेला पुढील सामना काहीही करुन जिंकावा लागेल. पावसामुळे याआधी देखील दक्षिण आफ्रिकेला आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.
1992 विश्वचषकाची उपांत्य फेरी-
1992 च्या विश्वचषकात, दक्षिण आफ्रिकेने साखळी टप्प्यातील आठ पैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंग्लंडशी होणार होता. आफ्रिकेने इंग्लंडला 252 धावांवर रोखून आपल्या विजयाचा पाया रचला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना, जेव्हा आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होती, तेव्हा पाऊस सुरू झाला. जेव्हा सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा मैदानात लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आफ्रिकेला एका चेंडूत जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता होती. या नियमावरून बराच वाद झाला, पण दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव पत्कारावा लागला.
2003 चा विश्वचषक-
उपांत्य फेरीत जाण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेशी सामना होता. आफ्रिकेसाठी ही ‘करो या मरो’ची लढाई होती. या सामन्यात श्रीलंकेने 268 धावा केल्या होत्या. 269 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आफ्रिकेने एकेकाळी 6 विकेट्स गमावून 229 धावा केल्या. संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 40 धावा करायच्या होत्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि अखेर सामना रद्द घोषित करण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले, जे दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी पुरेसे नव्हते.
2022 टी-20 विश्वचषक-
2022 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्ध सामना होता. या सामन्यात देखील पावसाने खो घातला. सामन्यातील षटकांची संख्या 9 षटकांपर्यंत कमी करण्यात आली आणि झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 79 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू होऊन फक्त दोन षटके झाली होती तेव्हा पाऊस सुरू झाला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा संघाला 7 षटकांत 64 धावांचे लक्ष्य मिळाले. पुन्हा पाऊस पडला आणि शेवटी सामना रद्द घोषित करण्यात आला. अशाप्रकारे, दक्षिण आफ्रिका गटात तिसऱ्या स्थानावर राहिली, जी त्यांना उपांत्य फेरीत नेण्यासाठी पुरेशी नव्हती.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.