मल्लखांबाला आवश्यक सोयीसुविधा पुरवा, युवासेनेची शारीरिक शिक्षण विभागाकडे मागणी

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश मिळवून देत विद्यापीठाच्या नावलौकिक अधिक उंचावला. मात्र मल्लखांब खेळासाठी आवश्यक सुविधांची आजही वानवा असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर या सुविधा पुरवा, अशी मागणी युवासेनेचे सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाच्या खेळ आणि शारीरिक विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांची भेट घेऊन केली. दरम्यान, या खेळातील खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येतील, असे आश्वासन संचालकांनी दिले.
मुंबई विद्यापीठाचे खेळाडू आणि खेळाडूंच्या प्रशिक्षकांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेना-युवासेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेना तत्कालीन सिनेट सदस्यांनी मल्लखांब खेळाला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सिनेटसह वरिष्ठ अधिकाऱयांचा कार्यकाळ संपला. परिणामी त्या कामाला पुढे चालना मिळाली नाही. या वर्षी पुन्हा विद्यापीठाच्या काही खेळाडूंनी वरुण सरदेसाई यांच्याशी याबाबत तक्रार केली. त्यानुसार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे, किसन सावंत, स्नेहा गवळी, व्यवस्थापन परिषद सदस्य-उपनेत्या शीतल शेठ, मिलिंद साटम, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या खेळ आणि शारीरिक विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी यांची भेट घेऊन मल्लखांब खेळाडूंना आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांनी मिळवले यश, पण विद्यापीठ मात्र उदासीन
महाराष्ट्राच्या मल्लखांब या खेळाचे मुंबई विद्यापीठातील मुले व मुली संघाने वर्ष 2021-2022 या वर्षी उत्कृष्ट खेळ करून जेतेपद मिळवले. या यशाबद्दल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता, मात्र त्यानंतरही युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा केल्यानंतर मल्लखांबासाठी तयारी करणाऱया विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत.
विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या!
विद्यापीठाच्या विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी खेळाडूंचा त्यांच्या पालकांसह कन्व्होकेशन हॉल येथे सत्कार करण्यात यावा त्याचबरोबर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशा आग्रही मागणीचे निवेदनही रेड्डी यांना देण्यात आले.
Comments are closed.