विदर्भचे आघाडी लक्ष्य, पहिल्या डावात विदर्भची 379 धावांची मजल; केरळला आघाडीसाठी हव्यात 248 धावा

पहिल्या डावात 379 अशी जबरदस्त मजल मारल्यानंतर रणजी जेतेपदावर आपली पकड मजबूत व्हावी म्हणून विदर्भने आपल्या डोळय़ासमोर पहिल्या डावात आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने केरळची 3 बाद 131 अशी स्थिती असली तरी रणजी जेतेपदाच्या सामन्यात तिसऱया दिवशी केरळला 379 धावांच्या आत गुंडाळण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. केरळला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अद्याप 249 धावांची गरज आहे, तर विदर्भला 248 धावांच्या आत केरळचे 7 फलंदाज बाद करायचे आहेत.

दैव बलवत्तर असलेला आणि देवभूमी केरळचा संघ रणजी जेतेपदाच्या निमित्ताने अवघ्या हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींच्या ओळखीचा झालाय. गेल्या दोन्ही सामन्यांत अवघ्या एक आणि दोन धावांची आघाडी घेत केरळने अंतिम फेरीत गाठलेली मजल स्वप्नवत ठरली आहे. आताही केरळचे पहिले ध्येय विदर्भच्या 379 धावांना गाठणे हेच आहे. आज पहिल्या डावात अवघ्या 15 चेंडूंत दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आदित्य सरवटे आणि अहमद इम्रान यांनी तिसऱया विकेटसाठी 93 धावांची भागी रचत केरळला सावरले. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सरवटे 66 धावांवर तर कर्णधार सचिन बेबी 7 धावांवर खेळत होता.

भुते-दुबेचा जोरदार शेवट

दानिश मालेवार आज आपल्या खेळीत केवळ 15 धावांचीच भर घालू शकला. बुधवारी 138 धावांवर खेळत असलेला दानिश 153 धावांवर बाद झाला. त्यामुळे विदर्भची 5 बाद 290 अशी स्थिती होती. मग ठाकूर (23) आणि राठोड (3) हे दोन्ही ‘यश’ बाद झाल्यामुळे विदर्भ 7 बाद 297 अशा स्थितीत पोहोचला. तेव्हा अक्षय वाडकर (23), अक्षय कर्णेवार (12), हर्ष दुबे (12)आणि नचिकेत भुते (32) यांनी 82 धावांची भर घालत संघाला 379 धावांपर्यंत नेले. कर्णधार अक्षय वाडकर बाद झाल्यानंतर नचिकेत भुते आणि हर्ष दुबे यांनी आक्रमक खेळ करत दहा षटकांत 44 धावा ठोकल्या.

नळकांडेने सलामीवीरांची यष्टी वाकवली

केरळच्या डावाची सुरुवात अत्यंत सनसनाटी झाली. दर्शन नळकांडेने आपल्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहन कुन्नुमल भोफळा न फोडताच बाद झाला. अवघी एक धाव फलकावर लागली होती. दुसऱया षटकात अक्षय चंद्रनने यश ठाकूरच्या पहिल्या चार चेंडूंवर तीन चौकार खेचत केरळला पहिल्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण नळकांडे आपल्या दुसऱया षटकात पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले आणि तिसऱया चेंडूवर चंद्रनची यष्टी वाकवत केरळला दुसरा त्रिफळाचीत धक्का दिला. मग आदित्य सरवटे आणि अहमद इम्रानने विदर्भच्या गोलंदाजांवर अंकुश लावले आणि केरळच्या फलकावर शतकी आकडा लावला. आता सामन्याचा तिसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघ आपला जोरदार खेळ दाखवतील. पहिल्या डावातील आघाडी केरळसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तेच होऊ न देण्याची विदर्भाची प्रथम प्राथमिकता असेल.

Comments are closed.