शिवसेनेच्या दणक्यानंतर गुजराती बोर्ड झाकला, चारकोपमधील चौकाच्या नामकरणात महापालिकेचा मराठी द्वेष
चारकोपच्या एकता नगर चौक येथे मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या गो-माता चौकाला गुजराती भाषेत लावलेला नामफलक शिवसेनेच्या दणक्यानंतर पालिकेने झाकला आहे. या ठिकाणी नव्याने तातडीने मराठी भाषेत ठळक अक्षरात बोर्ड लावण्याचे आश्वासन पालिकेकडून शिवसेनेला देण्यात आले. शिवसेनेच्या दणक्यामुळे पालिका प्रशासनाच्या ‘गुजराती प्रेमा’ला चाप बसला आहे.
कांदिवली पश्चिम, चारकोप विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्र. 20मधील एकता नगर चौक येथे पालिकेच्या माध्यमातून 2017मध्ये चौक बांधण्यात आला होता. मात्र या चौकाची दुरवस्था झाल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून चौकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात आले. मात्र सुशोभीकरण पूर्ण होताचा चौकाचे लोकार्पण झाल्यानंतर या ठिकाणी गुजराती भाषेत नामफलक लावण्यात आला. हा प्रकार समोर येताच स्थानिक रहिवाशी आणि शिवसैनिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या ‘गुजराती प्रेमा’चा निषेध करीत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली संबंधित पालिका अधिकाऱयांना याबाबत जाब विचारण्यात आला. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हायलाच हवा, असे बजावत या ठिकाणी मराठी भाषेत बोर्ड लावण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या वेळी पालिका अधिकाऱयांनी तातडीने बोर्ड झाकला असल्याची माहिती देत मराठी बोर्ड लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
पोलिसांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच नोटीस
गो-माता चौकाचे नामकरण मराठीला डावलून गुजरातीमध्ये केल्यामुळे रहिवासी, शिवसैनिकांच्या वतीने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेण्यात आली. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. या वेळी नामफलकामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशाराही देण्यात आला. मात्र पोलिसांनी शाखाप्रमुख विजय मालुसरे यांना नोटीस बजावत कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा दिला. यानंतरच अखेर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.
पाठपुराव्याला यश
आर/दक्षिण सहाय्यक आयुक्तांना जाब विचारून नामफलक मराठीत करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी विभागप्रमुख अजित भंडारी, महिला विभागप्रमुख मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख संतोष राणे, युवासेनेचे अभिषेक शिर्पे, विधानसभा संघटक राजन निकम, सत्यवान वाणी, अभिषेक दळवी, शुभम साळवी, सुषमा कदम, सुवर्णा प्रसादे, सविता देसाई, अनंत नागम, सीमा लोकरे, शाखा प्रमुख प्रसाद पाटील धर्मेश वर्टे, विजय भुवड, मयूर सावंत, संजय फरले, रमाकांत कदम, सुनील निगुडकर आदी उपस्थित होते.
- मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली. शाखा प्रमुख विजय मालुसरे, रवींद्र मर्ये, उपविभाग प्रमुख श्याम मोरे यांच्यासह शेकडो रहिवाशी-शिवसैनिकांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments are closed.