कम्युनिस्ट पक्षाचे नेते पी. राजू यांचे निधन झाले
वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/कोची
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी आमदार पी. राजू यांचे गुरुवारी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. ते काही काळापासून आजारी होते. त्यांचे पार्थिव सध्या रुग्णालयात ठेवण्यात आले असून अंत्यसंस्काराची घोषणा नंतर केली जाईल. त्यांच्या पश्चात पत्नी बी. लतिका कुमारी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केरळच्या राजकीय इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा अंत झाला आहे. केरळच्या राजकारणातील एक दिग्गज असलेले राजू हे सीपीआय राज्य परिषदेचे एक प्रमुख सदस्य होते.
त्यांनी अनेक वर्षे एर्नाकुलम जिल्हा सचिव म्हणून काम केले. पक्ष आणि राज्यातील कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. 18 जुलै 1951 रोजी जन्मलेल्या राजू यांच्यावर त्यांचे वडील एन. शिवन पिल्लई यांचा खूप प्रभाव होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. पी. राजू हे 1991 ते 1996 पर्यंत उत्तर परवूर मतदारसंघाचे आमदार होते. 1998 ते 2001 या काळात केरळ विधानसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या कायदेविषयक योगदानावर अधिक भर देण्यात आला. कायदेविषयक कामांव्यतिरिक्त राजू विविध संघटनांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. त्यांनी एर्नाकुलम जिल्हा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
Comments are closed.