भाजप महिला नेत्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 6 महिने छळछावणी

पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये चाकूचा धाक दाखवून प्रवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आज रायगडमध्येही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. सत्ताधारी भाजपच्या महिला नेत्याच्या मुलानेच हा बलात्कार केला आहे. मनीष म्हात्रे असे या नराधमाचे नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सहा महिने त्याने ही छळछावणी मांडत पीडितेवर अत्याचार केले आहेत. त्यामुळे सरकारचा लाडक्या बहिणीचा पुळका खोटा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या जिल्हा महिला सरचिटणीस वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष म्हात्रे यांची ‘स्नॅप चॅट’वरून पीडितेबरोबर मे 2024 मध्ये ओळख झाली होती. चॅटवरून ओळख वाढल्यानंतर या नराधमाने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचा झाशा दिला. नंतर सायन्स विषयाच्या नोट्स घेण्यासंदर्भात ते पेण येथील साई मंदिर परिसरात भेटले.
सप्टेंबर महिन्यात मनीष याने आपल्या चिंचपाडा येथील शिवाली गृहनिर्माण संस्था येथे घरी बोलावले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी त्याने व्हिडीओदेखील काढला आणि घडल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली. अशीच धमकी देऊन सहा महिने त्याने तिची छळछावणी मांडली होती.
Comments are closed.