Swargate Case Congress MLA Vijay Wadettiwar Slams Devendra Fadnavis
स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्ये मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीच्या तब्बल 70 तासांनंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
नागपूर : स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवनेरी बसमध्ये मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीच्या तब्बल 70 तासांनंतर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दत्तात्रय गाडे असे या प्रकरणातील नराधमाचे नाव आहे. हा दत्ता गाडे घटनेपासूनच फरार झाला होता. मात्र, या घटनेनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. (Swargate Case Congress MLA Vijay Wadettiwar Slams Devendra Fadnavis)
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सरकारवर त्यांनी निशाणा साधला. “राज्यात शक्ती कायदा लागू करण्याबाबतचे विधेयक आम्ही दोन्ही सभागृहात पास केले होते. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले. पण त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालीच नाही. मग आता ही स्वाक्षरी का झाली नाही, का स्वाक्षरी करून घेतली नाही, राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये, शक्ती कायद्यावर सरकारची भूमिका काय आहे, सरकारला राज्यात शक्ती कायदा लागू करायचा आहे की नाही, या प्रश्नांची उत्तर सरकारनं दिली पाहिजेत”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
याशिवाय, “शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी न केल्यानं ते विधेयक पुन्हा आलं. त्यानंतर हे विधेयक आम्हाला लागू करता येणार नाही ते मागे घ्यावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता हे सरकार नव्याने विधेयक आणणार आहे की नाही, राज्यात कायदा करणार की नाही, महिलांवरील अत्याचार वाढत राहुदे, अशी सरकारची भूमिका आहे का, हे सरकारनं स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारला आमचं आवाहन आहे की, हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका. त्या विधेयकात दुरूस्ती करा आणि या अधिवेशनात शक्ती कायदा लागू करण्याबाबतचे विधेयक आणा, अशी आमची मागणी आहे”, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
“महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणात पीडितेला लवकर न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने आणलेले शक्ती विधेयक राष्ट्रपतींनी मंजूर केले नाही त्यामुळे हा कायदा अस्तित्वात येणार नाही. आम्ही गेले अडीच वर्ष मागणी करतोय या कायद्याची अंमलबजावणी करावी पण या कायद्याबाबत महायुती सरकारने काहीच हालचाल केली नाही. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अस असताना महायुती सरकारची ही भूमिका खेदजनक आहे. महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून विधेयक अजून मंजूर करण्यात आलेला नाही का? महिलांशी संबंधित प्रश्नांवर राजकारण करण्याची संधी महायुती सरकारने सोडली नाही”, असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut : आपले गृहराज्यमंत्री दिव्यच…, योगेश कदमांच्या विधानावर राऊत संतापले
Comments are closed.