CM Devendra Fadnavis advice to Yogesh Kadam on sensitive matter


स्वारगेट बस स्थानकात घडलेली अत्याचाराची घटना शांततेत घडली, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यानंतर यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. याच प्रकरणावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री कदम यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

मुंबई : स्वारगेट बस स्थानकात घडलेली अत्याचाराची घटना शांततेत घडली, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यानंतर यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. घटनेच्यावेळी पीडित तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, असेही मंत्री कदम यांनी गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते. यावरून विरोधकांनी कदम यांना खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली आहे. तर आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणातील अनुभवावरून योगेश कदम यांना महत्त्वाचा सल्ला तर दिलाच आहे, त्यासोबत मंत्री म्हणून पहिल्यांदा कार्यकाळ सांभाळत असल्याचे सांगत त्यांची पाठराखण सुद्धा केली आहे. (CM Devendra Fadnavis advice to Yogesh Kadam on sensitive matter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 28 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना योगेश कदम आणि संजय सावकारे यांनी केलेले विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “योगेश कदम यांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. स्वारगेट आगार हा गर्दीचा परिसर आहे. तिथे अनेक लोक होते. गुन्हा घडलेली बस बाहेरच होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आला नाही, असे सांगण्याचा योगेश कदम यांचा प्रयत्न होता. तथापि, कदम नवीन मंत्री आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना सल्ला असेल की, अशा प्रकरणात बोलताना आपल्याला अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो.”

हेही वाचा… Amitesh Kumar : ‘नराधम दत्तात्रय गाडे आत्महत्या करणार होता, तेवढ्यात…’, पोलीस आयुक्तांचा मोठा दावा

मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर सुद्धा भाष्य केले. स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. याबाबत ते म्हणाले की, आरोपीला अटक झालेली आहे. तो लपून बसला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले आहे. या संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी काही माहिती दिली आहे. काही माहिती आता जाहीरपणे सांगणे योग्य नाही. योग्य स्तरावर तपास पोहोचला की, सगळी माहिती दिली जाईल. नेमका घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला, याबाबत वेळ आल्यावर आपल्याला सगळी माहिती मिळेल, असे फडणवीसांनी सांगितले.



Source link

Comments are closed.