शक्ती विधेयक मंजूर न होणे हे महायुती सरकारचं अपयश, अधिवेशनात पुन्हा विधेयक मांडा; वडेट्टीवार यांची मागणी

महिला अत्याचार विरोधात महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता. पण राष्ट्रपतींची स्वाक्षरी न झाल्यामुळे ही विधेयक मागे घेतले जाणार आहे, हे महायुती सरकारचे अपयश आहे, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना शक्ती कायद्याची आवश्यकता आहे. असं असताना राष्ट्रपतींची स्वाक्षरी का झाली नाही, सरकारची भूमिका खेदजनक आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात शक्ती विधेयक सरकारने पुन्हा आणावे, त्यांना वाटतात त्या आवश्यक सुधारणा करून विधेयक आणावे आणि राष्ट्रपतींकडे पुन्हा पाठवावे, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, राज्यात एकीकडे महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना महायुती सरकार मधील मंत्री असंवेदनशील वक्तव्य करत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री सावकारे यांची विधान ही आरोपीला वाचवण्यासाठी केली आहेत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महिलेवर अत्याचार झाला असताना तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे आरोपीची पाठराखण करणे आहे. आपल्या मंत्र्यांच्या या भूमिकेशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहमत आहेत का? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

Comments are closed.