हिमस्खलनात अडकलेल्या ब्रो प्रोजेक्टचे 57 कामगार
उत्तराखंड
उत्तरखंड बद्रीनाथ धामजवळील माना या गावी हिमस्खलन झाले आहे. यानंतर बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) या प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणारे ५७ कामगार चमोली येथे अडकले आहेत, अशी माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने दिलेल्या माहितीनुसार, या दलाची एक टीम जोशीमठहून बचाव कार्यासाठी निघाली आहे. आतापर्यंत यामधील १० कामगारांना वाचविण्यात आले आहे, तर उर्वरित कामगारांसाठी गढवाल ९ ब्रिगेड आणि BRO यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे.
कायदा आणि सुव्यवस्था महानिरीक्षक आणि उत्तराखंड पोलिस प्रवक्ते नीलेश भरणे म्हणाले, “SDRF टीम देखील बचावकार्यासाठी रवाना करण्यात आली आहे. सध्या, लष्कर, ITBP आणि BRO बचाव कार्य करत आहेत. आम्ही जोशीमठ येथून पोलिस पथके पाठवली आहेत आणि आतापर्यंत १० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे आणि यामध्ये बचाव करण्यात आलेल्यांना लष्कराच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.”
जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले की, परिसरात जोरदार हिमस्खलन झाल्यानंतर मार्ग आणि दळणवळण विस्कळीत झालेली आहे.
चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले, “ मानामध्ये हिमस्खलन झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये BRO प्रकल्पाच्या ठिकाणी बर्फ साफ करण्यासाठी तळ ठोकलेले ५७ कामगार अडकले आहेत. प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने, आम्हाला तिथे हेलिकॉप्टर सेवा वापरता आल्या नाहीत. तसेच, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे सॅटेलाइट फोन किंवा इतर उपकरणे नाही आहेत.”
राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केले की, “चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओने सुरू केलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबले गेल्याची दुःखद बातमी मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी भगवान बद्री विशाल यांना प्रार्थना करतो.”
Comments are closed.