Devendra fadnavis on dattatray gade akshay shinde encounter pune swargate rape case


मुंबई : स्वारगेट प्रकरणातील आरोपीला अटक झालेली आहे. तो लपून बसला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले आहे. ही संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे. काही माहिती आता जाहीरपणे सांगणे योग्य नाही. योग्य स्तरावर तपास पोहोचला की, सगळी माहिती दिली जाईल. नेमका घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला, याबाबत वेळ आल्यावर आपल्याला सगळी माहिती मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “यावर आता बोलणे खूप घाईचे होईल. या गोष्टीची निश्चित माहिती आल्यावर अधिक बोलणे योग्य होईल. आता पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. नंतर चौकशी होईल. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती आमच्याकडे आली आहे. त्या एकत्र करून बोलणे योग्य होईल.”

कदमांच्या बोलण्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले पाहिजे…

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक वक्तव्य केले होते. त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरून फडणवीस यांनी योगेश कदम यांना मोलाचा सल्ला दिला आहे. फडणवीस यांनी म्हटले, “योगेश कदम जे बोलले, त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवे. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते की, ‘हा गजबजलेला परिसर आहे. आजूबाजूला बरेच लोक होते, ती बस आतमध्ये उभी नव्हती, तर बाहेरच होती. पण, ही घडतेय, हे लोकांच्या लक्षात आले नाही, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता,’ असा माझा समजत आहे.”

थोडे जपून बोलले पाहिजे

“योगेश कदम नवीन आहेत. तरूण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना थोडे जपून, संवेदनशीलपणे बोलले पाहिजे. आपण बोलताना चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. कोणत्याही लोकप्रतिनिधीने अशा घटनांवर बोलताना संवेदनशीलपणे बोलले पाहिजे,” असे आवाहन सुद्धा फडणवीस यांनी केले आहे.



Source link

Comments are closed.