Amitesh Kumar reaction after Datta Gade arrest in the Swargate ST depot rape case
स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यात आली आहे. मात्र आता आरोपीच्या अटकेवरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.
पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारी रोजी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार घटना घडली. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी उजेडात आली. यानंतर सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी आंदोलन केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे या आरोपीच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली. मात्र घटनेच्या 48 तासांनंतरही आरोपी सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करत त्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले. घटनेच्या तब्बल 70 तासांनंतर आरोपी दत्ता गाडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मात्र आता त्याच्या अटकेवरून श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. (Amitesh Kumar reaction after Datta Gade arrest in the Swargate ST depot rape case)
पत्रकार परिषदेत अमितेश कुमार यांना विचारण्यात आले की, स्वारगेट पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यात दत्ता गाडे याला पकडण्यावरून श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले की, आरोपीला पकडण्यावरून कोणाचाही श्रेयवाद सुरू नाही. सांघिक प्रयत्नांनी आरोपीला पकडण्यात आले आहे. पुणे शहर पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी होते. याशिवाय गुन्हे शाखा विभाग, स्वारगेट पोलीस पथक, झोन 2 चे पथक आरोपीच्या गुणाट गावात तळ ठोकून होते. त्यातील काही अधिकारी मागील तीन दिवसांपासून तिथून हलले सुद्धा नाहीत. रात्री झोप न घेता दिवसरात्र काम करत होते. अशाप्रकराची कामगिरी पोलीस दलाने केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – Swargate Case : राज्यात सरकार शक्ती कायदा लागू करणार की नाही; विजय वडेट्टीवारांचा सवाल
अमितेश कुमार म्हणाले की, आरोपीच्या शोधासाठी आम्ही एसटी डेपोतील 23 सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील 48 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली आणि त्याच्या गावात जाऊन शोधमोहिम घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आज आरोपी सापडला. यासाठी आम्ही गावातील नागरिकांचे आभार मानतो. गावाला भेट देऊन नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तीने आरोपीची शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय गावासाठी काय करता येईल, याचाही आम्ही विचार करणार आहोत, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? याची चौकशी करणार
अमितेश कुमार म्हणाले की, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत. तसेच आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली आहे. परंतु दोरी तुटल्यामुळे आणि आरोपीच्या आसपास लोक असल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यामुळे आरोपी दत्ता गाडे याने खरंच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता का? याची चौकशी करण्याकरता घटनास्थळी पथक पाठवण्यात येणार आहे, अशी माहितीही अमितेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा – Ajit Pawar : स्वारगेट घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आरोपीला कोर्टात हजर…’
Comments are closed.