MTDC Maharashtra Women Day Special Announcement by Minister Shambhuraj Desai in Marathi
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच, ‘आई’ महिला केंद्रित समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. (MTDC Maharashtra Women Day Special Announcement by Minister Shambhuraj Desai)
हेही वाचा : EPF : मोठी बातमी! सीबीटीने भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराबाबत घेतला निर्णय
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 2024 मध्ये एमटीडीसीच्या महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. 1500 हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर 2025 मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा विशेष उपक्रम आहे. एमटीडीसीची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला-संचालित पर्यटक निवास पूर्णतः महिलांद्वारे संचलित केली जातात. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापन, सुरक्षा, टॅक्सी सेवा, स्वच्छता, हॉटेलिंग इत्यादी सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
महिला पर्यटकांसाठी 30 दिवसांची विशेष सवलत
1 ते 8 मार्च 2025 आणि वर्षभरातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस 50 टक्के सवलत असून या 22 दिवसांची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार. एमटीडीसीच्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाणार आहे. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच, महिला गाइड्स आणि जल पर्यटन प्रशिक्षकांना संधी दिली जाईल. महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन उपक्रमदेखील असणार आहेत.
Comments are closed.